बुलढाणा : येत्या नोव्हेंबर महिन्यात विदर्भात प्रवेश करणाऱ्या ‘भारत जोडो’ पदयात्रा यशस्वी करण्यासाठी प्रदेश काँग्रेसने कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून विदर्भातील अकरा नेत्यांवर ही यात्रा यशस्वी करण्याची जवाबदारी सोपविण्यात आली आहे.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली पदयात्रा नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्रात दाखल होणार आहे. मराठवाड्यानंतर ही यात्रा बुलढाणा जिल्ह्यात दाखल होणार असून जळगाव जामोद येथून मध्यप्रदेश मध्ये प्रवेश करणार आहे. ही पदयात्रा यशस्वी करण्यासाठी प्रदेश काँग्रेसने विदर्भातील ११ जिल्हा निहाय नेत्यांची नियुक्ति केली आहे.
हेही वाचा >>> वाशीम : भाजपचा महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्षाला अप्रत्यक्ष पाठिंबा ?
बुलढाणा जिल्ह्याची जवाबदारी प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड यांच्यावर सोपविण्यात आली आहे. बुलढाणा येथील रहिवासी असलेले राठोड हे ज्येष्ठ नेते खासदार मुकुल वासनिक यांचे निष्ठावान व आमदार पटोले यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. पश्चिम विदर्भात अकोला येथून प्रशांत गावंडे, वाशीममधून दिलीप सरनाईक, यवतमाळातून तातू देशमुख, अमरावती शहर व ग्रामीणमधून वीरेंद्र जगताप या नेत्यांवर जवाबदारी राहणार आहे. पूर्व विदर्भातील नेमणूक पुढीलप्रमाणे आहे. वर्धेतून अशोक शिंदे, नागपूर शहर व ग्रामीणमधून रवींद्र दरेकर, भंडारातून नाना गावंडे, गडचिरोलीतून नामदेव किरसान, गोंदिया पी. जी. कटरे, चंद्रपूर शहर व ग्रामीण सुभाष धोटे.
हेही वाचा >>> लोकप्रतिनिधींकडून होणारा वाळूचा काळाबाजार खपवून घेणार नाही ; मिनकॉन परिषदेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सुनावले
दरम्यान, वरील बहुतेक नेते प्रदेश पदाधिकारी असून त्यांच्यावर मुख्यत्वे समन्वयाची जवाबदारी राहणार आहे. त्यांना काँग्रेस जिल्हाध्यक्ष बरोबर समन्वय ठेऊनच काम करावे लागणार आहे. पदयात्रेत सहभागी जिल्ह्यातील पदयात्रींना निर्धारित मार्गावर वेळेपूर्वी उपस्थित ठेवणे, त्यांची यादी प्रदेश समितीला पाठविणे, पदयात्रींना पदयात्रा मार्गावरील ठिकाणची माहिती देणे, वातावरण निर्मिती साठी नियुक्त नेत्यांच्या कार्यक्रमाचे नियोजन करावे लागणार आहे. दुसरीकडे या पदयात्रेसाठी मुंबई स्थित महाराष्ट्र् प्रदेश काँग्रेस समिती कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नियुक्त ११ पदाधिकाऱ्यांनी आवश्यकतेनुसार या कक्षाशी संपर्क साधावा असे निर्देश देण्यात आले आहे. या नेत्यांना आपल्या दैनंदिन कामाचा अहवाल ‘प्रदेश’ ला कळवावा लागणार आहे.