अकोला : पावसाचे पाणी विविध भागांमध्ये साचल्याने साप आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील एका शेतातील झाडावर तब्बल ११ फूट लांब अजगर आढळून आला, तर शहरातील गंगा नगर भागात एका घरात चक्क सात साप दिसून आले. दोन्ही वेगवेगळ्या घटनेत सर्पमित्रांनी त्यांना पकडत जंगलात सोडून देत जीवदान दिले.

पातूर तालुक्यातील बाभुळगाव येथील शेत मालक विठ्ठल गावंडे यांच्या शेतातील झाडावर ११ फूट लांब अजगर बसला होता. तो दिसून आल्यावर अनेकांची भंबेरी उडाली. अकोला येथून सर्पमित्र सुजित देशमुख, सुरज इंगळे यांना पाचारण करण्यात आले. सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीने अजगराला पकडून पातूर वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष त्या अजगराला वन क्षेत्रात सोडण्यात आले.

हेही वाचा – नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण झालेल्या क्षतिग्रस्त पुलाच्या महाआरतीला परवानगी नाकारली; नेमके झाले तरी काय, वाचा…

हेही वाचा – अकोला : अतिवृष्टीमुळे १.४२ लाख हेक्टरवरील पिकांची माती; पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान

दुसऱ्या घटनेत गंगा नगर भागात पुरवावर यांच्या घरात अनेक साप असल्याचे आढळून आले. पुरवावर यांनी तातडीने सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. त्यांनी तात्काळ धाव घेतली. एक-एक सापाला पकडून बरणीत टाकले. हे सर्व साप नानेटी जातीचे असून, ते बिनविषारी व निरुपद्रवी असल्याचे बाळ काळणे यांनी सांगितले. नानेटी जातीचे साप समुहाने राहतात. या सापांपैकी एखाद्याला मारले तरी त्याची भावंड त्या ठिकाणी दिसून येतात. त्यामुळे साप प्रतिशोध घेण्यासाठी आल्याचा गैरसमज लोकांमध्ये वाढतो. हे साप बिनविषारी असतात, असे बाळ काळणे म्हणाले.

Story img Loader