चंद्रशेखर बोबडे, लोकसत्ता
नागपूर: महाराष्ट्रात मागील तीन वर्षात (२०२० ते २०२२) भटक्या श्वानांनी चावा घेण्याच्या तब्बल ११ लाख ९ हजार ७६० घटनांची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ही सरकारी आकडेवारी आहे. ग्रामीण भागातील अनेक प्रकरणांची नोंदच होत नसल्याने ही संख्या अधिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात २०२०- २०२२ या तीन वर्षात तब्बल ११ लाख ९ हजार ७६० घटना नोंदवण्यात आल्या आहेत. २०२० मध्ये ५ लाख ८ हजार ६२० लोकांना, २०२१ मध्ये २ लाख १० हजार २६२ तर २०२२ मध्ये ३ लाख ९० हजार ८७८ लोकांना भटक्या श्वानांनी चावा घेतला. २०२१ च्या तुलनेत २०२२ या संख्येत १ लाख ८० हजार ६१६ ने वाढ झाल्याचे निदर्शनास येते. २०२२ मध्ये संपूर्ण देशात भटके श्वान चावण्याच्या घटनेत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे दिसून येते. त्यानंतर तामिळनाडूचा (३,६४,२१०) चा क्रमांक आहे.
भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय पशुसंवर्धन विभागाने प्राणी जन्म नियंत्रण (कुत्रे) नियम, २००१ (२०१० मध्ये सुधारित) कायदा केला असून त्याची अंमलबजावणी स्थानिक प्राधिकरणांना करावयाची आहे. यात प्रामुख्याने भटक्या श्वानांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण व त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्यावर नसबंदीची शस्त्रक्रिया करणे यावर अधिक भर देण्यात आला आहे. २०२३० पर्यंत भटका कुत्रा चावल्यामुळे होणाऱ्या रेबीजचे निर्मूलन करण्यासाठी विशेष कार्ययोजना तयार करण्यात आली आहे. या उपाययोजनांनतरही भटक्या श्वानांनी चावा घेण्याच्या घटनांमध्ये वर्षभरात वाढ नोंदवली गेली आहे.