नागपूर : सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर झाला असून राज्य शिक्षण मंडळाचाही निकाल लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे नागपूर महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार २५ मेपासून ऑनलाइन नोंदणी, प्रवेश अर्जाचा भाग एक भरता येणार असून, दहावीच्या निकालानंतर दहा ते पंधरा दिवसांनी प्रवेशाची पहिली फेरी होणार आहे. तर ऑगस्ट अखेरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा – नागपूर : भरधाव ट्रकची ट्रिपल सीट जाणाऱ्या दुचाकीला धडक; तिघे ठार
शैक्षणिक वर्ष २०२३-२४साठी अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पूर्व तयारी करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी आणि पालकांना माहिती, मार्गदर्शन मिळण्यासाठीचे नियोजन आणि कृती आराखडा तयार करण्यासह विद्यार्थी-पालकांसाठी उद्बोधन वर्ग, शाळा मार्गदर्शन केंद्रासाठी प्रशिक्षण आयोजित करण्याबाबतच्या सूचना विभागीय शिक्षण उपसंचालकांना देण्यात आल्या आहेत. अकरावी प्रवेशासाठी शहरातील २१८ कनिष्ठ महाविद्यालयांमधील ५९ हजार १९५ जागांवर प्रवेश होणार आहेत. मागील वर्षी २५ हजार २४५ जागा रिक्त राहिल्या होत्या.