नागपूर : तो त्यांचाच अधिवास होता, पण माणसांनी त्यावर आक्रमण केले. त्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना केली नाही आणि परिणामी अधिसुची एक मधील (पूर्णपणे संरक्षित प्रजाती) तब्बल १२ काळविटांना सोलापूर-पुणे-मंगळवेढा या राष्ट्रीय महामार्गावर जीव गमवावा लागला. रविवारची संध्याकाळ त्यांच्यासाठी कर्दनकाळ ठरली.
वन्यजीव अधिवासातून जाणाऱ्या विद्यमान आणि प्रस्तावित रेखीय प्रकल्पांवर अपघात कमी करण्याच्या उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आहेत. मात्र, अनेकदा संबंधित यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष होते. सोलापूर-पुणे-मंगळवेढा या राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल बांधण्यात आला, पण वन्यप्राण्यांसाठी खालून भूयारी मार्ग तयार करण्यात आले नाहीत. त्यामुळे उड्डाणपुलावरून तर वाहने जातातच, पण खालूनही भरधाव वेगाने वाहने धावतात. हा काळविटांचा अधिवास आहे. या परिसरात आता केवळ २०० ते ३०० च्या संख्येने काळवीट राहीले आहेत. वाघाप्रमाणेच भारतातील अधिसूची एकमधील हा वन्यप्राणी असूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
हेही वाचा – नागपूर : प्रतिस्पर्धी उमेदवार एकाच मतदान केंद्रावर, घेतली गळाभेट; म्हणाले…
रविवारी सायंकाळी काळविटांचा कळप मार्ग न सापडल्यामुळे उड्डाणपुलावर चढला. पलीकडून येणाऱ्या भरधाव वाहनामुळे अतिशय संवेदनशील असणारा हा प्राणी गोंधळला आणि त्यांनी थेट उड्डाणपुलावरून उड्या मारल्या. एक-दोन नव्हे तर तब्बल १२ काळवीट यात मृत्युमुखी पडले. याबाबत राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीचे माजी सदस्य किशोर रिठे म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात अशी अनेक क्षेत्र आहेत, ज्या ठिकाणी उपशमन योजना नाहीत. सोलापूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर-अमरावती ही क्षेत्र उपशमन योजनांसाठी सूचित करण्यात आली आहेत. वनखात्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागांना त्यासंबंधात पत्र देखील लिहिले आहे. महाराष्ट्राच्या वन्यजीव कृती आराखड्यात त्याचा समावेश आहे. मात्र, त्याकडे गांभीर्याने न पाहिल्याने यासारख्या दुर्घटना वारंवार घडू शकतात, अशी भीती रिठे यांनी व्यक्त केली.