नागपूर : सात ते आठ दशकानंतर सप्टेंबर २०२२ मध्ये भारतात आठ चित्त्यांचे आगमन झाले. हे आठही चिते आता भारतातील वातावरणात रुळले आहेत. मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सफारीदरम्यान पर्यटकांना चिते दिसू शकतील, असे संकेत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिले. त्यानंतर आता येत्या फेब्रुवारीमध्ये दक्षिण अफ्रिकेतून १२ चिते येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सप्टेंबर महिन्यात नामिबिया येथून भारतातील मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात पाच मादी व तीन नर चिते आणले. या चित्त्यांना सुमारे एक महिना विलगीकरणात ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांना खुल्या पिंजऱ्यात सोडण्यात आले, ज्याठिकाणी ते आता शिकारीला सरावले आहेत. त्यामुळे लवकरच त्यांना खुल्या जंगलात सोडण्याचे संकेत मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. आता आणखी १२ चित्ते दक्षिण अफ्रिकेतून लवकरच येणार अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या १२ चित्त्यांच्या स्थानांतरणाबाबत दोन्ही देशातील सामंजस्य करारावर अद्याप स्वाक्षरी झालेली नाही. मध्यप्रदेश वनखात्यात याबाबत तयारी सुरू झाल्याचे चित्र असले तरीही भारतातील तज्ज्ञांची चमू अजूनपर्यंत यासाठी दक्षिण अफ्रिकेला गेलेली नाही. मात्र, भारतात आणखी चित्ते येणार हे नक्की आहे.
दरम्यान, जे चित्ते भारतात आणण्यात येणार आहेत, त्यांना दक्षिण अफ्रिकेतच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या १२ चित्त्यांमध्ये सात नर आणि पाच मादी चित्त्यांचा समावेश आहे. याबाबत मध्यप्रदेश वनखात्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.