नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षांना बुधवार २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. नागपूर विभागातून १ लाख ६३ हजार १७ विद्यार्थी परीक्षा देणार आहे. विभागातील ४९८ केंद्रांवर विद्यार्थी परीक्षा देणार आहे. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी यंदा प्रत्येक जिल्ह्यात पाच भरारी पथके तयार करण्यात आली आहे. इंग्रजी विषयाच्या पेपरने परीक्षेला सुरुवात होणार आहे.
शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, मौखिक आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २० फेब्रुवारीपर्यंत घेण्यात आल्या. तर लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत पार पडणार आहेत. यासाठी परीक्षा केंद्रांची व्यवस्था केली जात आहे. सरकारी शाळांसोबतच अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील खोल्या या परीक्षांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागपूर विभागाच्या वतीने परीक्षेसाठी चोख बंदोबस्त केला जात आहे. प्रश्नपत्रिकांसाठी विभागात ८४ ‘कस्टडी’ तयार करण्यात आल्या आहेत. तर ४९८ परीक्षा केंद्रावर १ लाख ६३ हजार १७ विद्यार्थी परीक्षा देणार आहे. यामध्ये मुलांची संख्या ८३ हजार ७६४ तर मुलींची संख्या ७९ हजार २५२ आहे. तर एक तृतीय पंथी उमेदवार आहे. यामध्ये विज्ञान शाखेतील सर्वाधिक म्हणजे ८६ हजार ७११ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. याशिवाय कला शाखेत ५२ हजार ४९३, वाणिज्य शाखेत १८ हजार ७३, एमसीव्हीसी ५१३४, आयटीआय ६०६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
प्रत्येक जिल्ह्यात पाच भरारी पथके
परीक्षेमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाने विविध उपाययोजना केल्या आहेत. यंदा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पाच भरारी पथके ठेवण्यात आली आहेत. यामध्ये प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, डायट, योजना आणि उपशिक्षणाधिकारी यांच्या भरारी पथकांचा समावेश असेल. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील महसुली विभागाचे भरारी पथकही परीक्षा केंद्रांवर नजर ठेऊन राहणार आहेत. याशिवाय भ्रमनध्वनी व अन्य तांत्रिक उपकरणांना परीक्षा केंद्रावर बंदी आहे.
जिल्हा विद्यार्थी संख्या
भंडारा – १८,०२४
चंद्रपूर – २८,८१९
नागपूर – ६६,४४५
वर्धा – १६,८८६
गडचिरोली – १२,८६५
गोंदिया – १९,९७८
एकूण – १,६३,०१७
हेही वाचा – लोकसभा निवडणुकीत ‘अबसेंटिव्ह’ मतदानाचा पर्याय, ‘या’ मतदारांना घरबसल्या मतदानाची मुभा
परीक्षेला जाताना ही काळजी घ्या
- हॉल तिकीट सोबत ठेवावे.
- एकाच रंगाची काळे किंवा निळे दोन पेन सोबत ठेवावे.
- पाण्याची बाटली, घड्याळ जवळ असावे.
- पुरवणी दोऱ्याने बांधावी स्टेपलरचा वापर करू नये.
- लिखित स्वरूपातील कोणतेही साहित्य जवळ ठेवू नये.
- प्रश्नपत्रिकेवर काहीही लिहू नये.
- परीक्षा केंद्रात डिजिटल उपकरणे घेऊन जाऊ नये.