लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडचिरोली : सत्ता परिवर्तनानंतर छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात धडक कारवाई सुरूच असून सुकमा जिल्ह्यात १० मे रोजी सुरक्षा जवान व नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. या कारवाईत तब्बल १२०० जवानांचा सहभाग होता.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट आहे. त्यातच माओवाद्यांचा ‘टीसीओसी’ कालावधी सुरु आहे. या कालावधीत ते सुरक्षा जवानांवर हल्ले करुन घातपात करण्याची शक्यता असते. १० मे रोजी सुकमा जिल्ह्याच्या सीमेवरील गंगालूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पीडिया जंगलात नक्षल वादी व पोलिसांत जोरदार चकमक उडाली. छत्तीसगडमधील विजापूर, बस्तर व सुकमा या तीन जिल्ह्यांच्या तब्बल १२०० जवानांनी संयुक्तपणे घेरुन नक्षलवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. यात १२ नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

आणखी वाचा-दारु परवाना वितरणात गैरव्यवहार, एसआयटी चौकशीची मुनगंटीवारांची मागणी

मोठा शस्त्रसाठा जप्त

घटनास्थळाहून सुरक्षा जवानांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. या चकमकीदरम्यान आणखी काही माओवादी जखमी असल्याची माहिती आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळी विशेष पोलिस महानिरीक्षक, तीनही जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक असे वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून आहेत.

१० दिवसांतील दुसरे मोठे एन्काऊंटर

छत्तीसगड सीमेवरील अबूझमाड जंगलात महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला ३० एप्रिल २०२४ रोजी छत्तीसगडमधील सुरक्षा जवान व नक्षलवाद्यांत चकमक झाली होती. यात दहा नक्षल्यांना ठार करण्यात जवानांना यश आले होते. त्यानंतर दहा दिवसांतच बारा जवानांचा खात्मा केल्याने हे सुरक्षा यंत्रणेचे मोठे यश मानले जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12 naxalites killed in chhattisgarh joint operation of 1200 jawans in three districts ssp 89 mrj
Show comments