लोकसत्ता टीम
वर्धा : आर्वी येथील नेहरू मार्केट परिसरातील तब्बल बारा दुकाने आज पहाटे फोडण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. पहाटे १ ते साडे तीनच्या दरम्यान हा प्रकार घडला. ही ५ ते ६ आरोपीची टोळी असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. आज सकाळी येथील व्यावसायिक नितीन जयसिंगपूरे हे नेहमीप्रमाणे आपले हॉटेल उघडण्यास आले होते. त्यावेळी त्यांना समोरील काही दुकानाचे शटर उघडे दिसले. त्यांनी मग लगेच फोनवरून परिचित दुकानदारांना ही माहिती दिली. ही माहिती पसरताच आर्वी शहरात खळबळ उडाली.
दुकान फोडण्याचा प्रकार आश्चर्यत टाकणारा म्हटल्या जातो. कारण दुकानाचे शटर लोखंडी कांबीने वाकविण्यात आले आहे. हे एकट्या चोराचे काम असू शकत नाही. एकाही दुकानास सेंट्रल लॉक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणून थेट शटर वाकवून चोरट्यानी दुकानात प्रवेश केल्याचे दिसून येते. प्रामुख्याने किराणा दुकानेच आहे. दुकानातील तंबाखू, सिगरेट पाकिटे, सुपारी हा जिन्नस चोरी करण्यात आला आहे. असे हे शौकीन भामटे कोण, याची चर्चा होत आहे. तसेच त्यांनी दुकानातील सीसीटिव्ही कॅमेरे फिरवून ठेवण्याची हुशारी दाखविली. त्यामुळे हे अट्टल चोर असण्याची दाट शक्यता व्यक्त होते.
नेहरू मार्केट हा आर्वीतील सर्वात गजबजलेला परिसर समजल्या जातो. त्यामुळे मध्यरात्री जरी चोरी झाली असली तरी एकाच वेळी १२ दुकाने फोडण्याचे धाडस कास काय साधले, याचे आश्चर्य व्यक्त होते. टावरी किराणा, लक्ष्मी जनरल स्टोअर्स, लक्ष्मी किराणा भंडार, ताजदार किराणा, राजू किराणा, जयश्री किराणा स्टोअर्स, कृष्णा किराणा, प्रकाश गुल्हाने, संजय ट्रेडर्स, जेठानंद किराणा दुकान, हरिओम किराणा स्टोअर्स अशी दुकानांची नावे आहेत. एकाच वेळी इतकी दुकाने फोडण्यात आली आणि कुणालाच कसा काही थांगपत्ता लागला नाही, याविषयी तर्क व्यक्त होत आहे.
पोलीस ठाणे लागूनच आहे. एक दुकान फोडायला किमान पाच मिनिटे लागू शकतात. तर १२ दुकाने फोडण्यास बराच वेळ लागू शकतात. अर्धा पाऊण तास हा धाडसी प्रकार सूरू होता. आमदार सुमित वानखेडे म्हणाले की ही धक्कादायक घटना म्हणावी लागेल. प्रमुख वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बोलणे झाले आहे. हा तर शहराच्या सुरक्षेवरच प्रश्नाचिन्ह निर्माण करणारा हा प्रकार आहे. परिसरातील चोरटे असण्याची शक्यता सांगण्यात येत असल्याचे आमदार वानखेडे म्हणाले.