लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर: ४३ ते ४४ अंश सेल्सिअसचे तापमान, कडक ऊन अशी परिस्थिती असताना शहरात पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. शहरातील १७ प्रभागात भीषण टंचाई आहे. सव्वा चार लाख लोकसंख्येच्या चंद्रपूर शहरात ऐन उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अनेक प्रभागात पाणीच येत नसल्यामुळे कोट्यावधीचा खर्चून करून बांधण्यात आलेली अमृत पाणीपुरवठा योजना तहान भागवू शकलेली नाही. गेल्या साडेसात वर्षातील सत्ताधारी भाजपाच्या तथा विद्यमान प्रशासकाच्या नियोजनशून्य कारभारामुळे विविध प्रभागात १२ टँकरव्दारे तीन वेळेस पाणी पुरवठा करावा लागत आहे.

चंद्रपूर शहरात महापालिका अस्तित्वात येवून अकरा वर्षापेक्षा अधिक काळ झालेला आहे. या कालावधीत शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली. वस्त्या वाढल्याने अनेक प्रभागाचा विस्तार झाला. महापालिका क्षेत्रात पायाभूत सुविधा पोहोचविण्याची मुख्य जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे. मात्र, बहुसंख्य प्रभागात पाणी पुरवठ्यासह इतर सोई-सुविधा पोहोचल्याच नाहीत. पायाभूत सुविधेसाठी केंद्र व राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी आला. मात्र, गेल्या साडेसात वर्षात या निधीचा योग्य व नियोजनपूर्वक वापर झाला नाही. त्याचा परिणाम दरवर्षी प्रमाणे यंदाही चंद्रपुरकरांना पिण्याचे पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागत आहे. चंद्रपूर पालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र शासनाच्या निधीतून ३०० कोटींपेक्षा अधिकची अमृत पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. अमृत पाणीपुरवठा योजनाचे कामाला पाच वर्षापेक्षा अधिकचा कालावधी लोटला असतांनासुध्दा ही पाणीपुरवठा योजना पूर्वत्वास गेली नाही.

हेही वाचा… यवतमाळ : १० हजारांची लाच घेताना अडकले अन् कार्यालय परिसरात फटाके फुटले…

अनेक प्रभागात पाईपलाईनचे काम सुरू आहे. तर, काही ठिकाणी नळाला मीटर लावण्याचे काम सुरू आहे. ज्या प्रभागात पाईपलाईन व नळजोडणी झाली आहे. त्याठिकाणी मात्र, एक थेंबसुध्दा पाणी येत नसल्याचे चित्र शहरात आहे. काही मोजक्याच व उतार भागातील नळाला पाणी येत आहे. त्यामुळे नागरिक संतापले असून पालिका प्रशासनावर रोष व्यक्त करीत आहे. चंद्रपूर शहराचे तापमान देशासह राज्यात सर्वाधिक असतांना येथे नियमित पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे. मात्र विठ्ठल मंदिर वॉर्ड, बिनबा गेट परिसर, श्यामनगर, इंदिरानगर यासह अनेक प्रभागात नळाला पाणीच येत नाही. त्यामुळे पालिका प्रशासने १२ टँकरच्या माध्यमातून शहरात पाणी पुरवठा होत नसलेल्या प्रभागात सकाळ, दुपार, सायंकाळ अशा तीन पाळ्यामध्ये पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

हेही वाचा… वाशीम: शेतकऱ्यांनी व्यथा मांडायच्या तरी कुणासमोर?, पालकमंत्री राठोड वाशीम जिल्ह्यात फिरकलेच नाही

विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात युवक कॉग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश अडून यांनी शेकडो महिलांसह पालिकेवर धडक देवून पिण्याचे पाणी द्या, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यांच्या इशाऱ्यानंतर इंडस्ट्रीअल इस्टेट प्रभाग, रयतवारी कॉलरी, प्रगतीनगर, बिएमटी चौक, आमटे ले आऊट या परिसरात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. प्रत्येक प्रभागात सिंटेक्स टँक लावून पाणी द्यावे अशीही मागणी केली आहे. सलग साडेसात वर्ष महापालिकेत भाजपाची सत्ता होती. महापौर पासून तर सर्व पदाधिकारी भाजपाचे होते. मात्र आता महानगर भाजपा अध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनीच आयुक्तांची भेट घेत शहरात सर्वत्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तेव्हा पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली आहे. दरम्यान शहरातील विविध प्रभागात १२ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. लवकरच पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे अभियंता विजय बोरीकर यांनी दिली.

हेही वाचा… भारतीय वन्यजीव संस्था करणार समृद्धी महामार्गावरील वन्यप्राणी उपशमन योजनांचे मूल्यमापन

पावसाळ्यात इरई धरण १०० टक्के भरल्याने चंद्रपूर शहराला दररोज पाणी पुरवठा होणे अपेक्षित होते. मात्र, पालिका प्रशासन मागील दोन वर्षापासून एक दिवसाआड पाणी पुरवठा करीत आहे. शहराला महिन्यातून केवळ १२ ते १५ दिवस पाणीपुरवठा होतो. असे असताना पालिका प्रशासन पाण्याचे देयके आकारतांना १२ ते १५ दिवसाचे देयके न घेता चक्क १ महिन्याचे देयक आकारत आहे. महापालिकेतर्फे नागरिकांची ही अक्षरश: लूट असल्याचे आता बोलले जात आहे.