नागपूर : सावत्र वडिलानेच एका बारा वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कार प्रकरणात चोवीस तासाच्या आतमध्ये यशोधरानगर पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली व मुलीचा खून होण्यापासून वाचवले. या तपासाकरिता शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी यशोधरानगर पोलीस ठाणे गाठून पोलिसांची पाठ थोपटली.
गेल्या १८ डिसेंबरला सावत्र वडिलाने बारा वर्षीय मुलीचे अपहरण करून भंडारा जिल्ह्य़ातील पवनी येथे घेऊन गेला. तेथे तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, यशोधरानगरनगर पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार तिच्या आईने दिली. तेव्हा वडिलाने तिचा खून करायला नको म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायण्णावार यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली व सहाय्यक निरीक्षक पंकज बोंडसे, दीपक धानोरकर, संतोष यादव आणि नीलेश घायवट यांनी तपास केला असता आरोपीने मित्राची दुचाकी नेल्याचे कळले. पोलिसांनी स्वत:ला दुचाकीचा मालक सांगून आरोपीला दुचाकी परत करण्यासाठी बोलावून घेतले. आरोपी शहरात दाखल होताच त्याला अटक केली. पीडित मुलीची सुटका केली. त्यावेळी त्याने तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पण, मुलीचा जीव वाचल्याने तिच्या आईने सुटकेचा नि:श्वास टाकला. या तपासाची माहिती आमदार बाळू धानोरकर यांना समजली. त्यांनी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते गुलाम अशरफी यांच्यासह पोलीस ठाणे गाठले व रायण्णावर यांना तपासासाठी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.