* ‘स्मार्ट सिटी’ला पर्यावरणमुक्त करणार
* स्टार बसचे भवितव्य धोक्यात?
शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असताना उपराजधानीत येत्या पाच वर्षांत प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणाच्या दृष्टीने शहराला आवश्यक असलेल्या १२०० ग्रीन बसेस उपराजधानीत धावणार असून त्या दृष्टीने महापालिकेचे प्रयत्न सुरू झाले आहे. शहरात जर पाच वषार्ंत ग्रीन बसेस धावणार असतील येणाऱ्या काळात स्टार बसचे भवितव्य धोक्यात येणार असल्याची चिन्हे आहेत.
दीडवर्षां पूर्वी प्रायोगिक तत्त्वावर महापालिकेतर्फे शहरात इथेनॉलवर चालणारी ग्रीन बस सुरू केली. त्याला मिळालेला प्रतिसाद बघता शहराला या बसेसची जनतेकडून मागणी वाढली आहे. नागपुरातील या पथदर्शी प्रकल्पामुळे भारतातील विविध राज्यात ही बस सुरू करण्याचा संकल्प केला. शहरात गेल्या आठ वर्षांपासून महापालिकेने एका खासगी कंपनीने स्टार बस सेवेचे कंत्राट दिल्यानंतर गेल्या चार पाच वषार्ंत बसची झालेली दुरवस्था आणि कंपनीची मनमानी बघता स्टार बसच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘स्मार्ट सिटी’कडे शहराची वाटचाल सुरू आहे. शहराच्या बाहेर अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि खासगी महाविद्यालय वाढत असताना अनेक मुले दुचाकी वाहनाने जात असतात. एज्युकेशन आणि उद्योग हब म्हणून येणाऱ्या काळात शहराची वाटचाल सुरू असताना विद्यार्थ्यांना महाविद्यालय आणि कंपनीपर्यंत पोहोचण्यासाठी या ग्रीन बसचा उपयोग केला जाणार आहे.
येणाऱ्या काळात शहरातील काही भागातून मेट्रो रेल्वे धावणार असली तरी ज्या भागात मेट्रो धावणार नाही त्या भागात लोकांच्या सोयीसाठी ग्रीन बसची व्यवस्था राहणार आहे. विशेषत शहराच्या बाहेर असलेल्या महाविद्यालय आणि कंपनीमध्ये जाणाऱ्या लोकांसाठी ग्रीन बसचा उपयोग केला जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर ही बस सुरू करण्यात आल्यानंतर येत्या वर्षभरात १०० बसेस येणार तर पाच ते सहा वषार्ंत १२०० बसेस आणण्याचा महापालिकेचा प्रयत्न राहणार आहे. त्यादृष्टीने राज्य व केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. शहरात पाच वर्षांत १२०० ग्रीन बस सुरू केल्या तर भारतात नागपूर हे एकमेव ग्रीन बस चालणारे शहर होईल. मधल्या काळात स्कॅनिया इंडिया कंपनीचे विपणन संचालक क्रिस्टर थुलील नागपुरात आले असता त्यांनी शहराला आवश्यक असलेल्या १२०० पेक्षा अधिक बसेसचा पुरवठा करणार असल्याचे सांगितले होते.
शहरामध्ये ५० हजार चौरस फुटाच्या जागेत या बसेससाठी डेपो तयार करण्यात येणार असून इथेनॉलचा साठा व दुरुस्ती या ठिकाणी केली जाणार आहे. बसेसचे चालक स्कॅनिया कंपनी आहे. शहरातील कचऱ्यापासून बोयोगॅस व इथेनॉलची निर्मिती करणे व शहरातील सार्वजनिक वाहतुकीसाठीच त्याचा उपयोग करणे अशी कंपनीची संकल्पना आहे. स्कॅनिया कंपनीने इतर कंपन्यासोबत संपर्क करून नागपुरात बायोगॅस तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शहरातील घाण पाण्यापासून बायोगॅस तयार करण्यात येईल. स्वीडिश एन्व्हार्यनमेंट रिसर्च इन्स्टिटय़ूटने नागपुरात बायोगॅस निर्मितीसाठी अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी पाऊल उचलले आहे. इथेनॉल शहरात तयार होत आहे. वाहनांसाठी आवश्यक इथेनॉल निर्मितीसाठी अॅक्झोनोबलने पुढाकार घेतला आहे.
या संदर्भात परिवहन समितीचे सभापती बंडू राऊत यांनी सांगितले, प्रोयोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या ग्रीन बसला मिळालेला प्रतिसाद बघता लवकरच आणखी बसेससाठी निविदा काढली जाणार आहे. या शहराला १२०० बसेसची आवश्कता असल्यामुळे येत्या पाच सहा वषार्ंत त्या उपलब्ध होण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य पातळीवर प्रयत्न सुरू आहे. ‘स्मार्ट सिटी’ तयार करताना बससेवा ही चांगल्या पद्धतीची असावी असा प्रयत्न राहणार आहे. स्टार बस बंद करण्याचा सध्या विचार नाही. शहराचा वाढती लोकसंख्या आणि विस्तार बघता ज्या ठिकाणी ग्रीन बस धावणार नाही, त्या ठिकाणी स्टार बस सुरू राहतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा