मंगेश राऊत,राम भाकरे 

महापालिकेच्या प्राथमिक सव्‍‌र्हेतील धक्कादायक माहिती

भरतनगर-तेलंगखेडी येथे मेट्रोद्वारे रस्ता तयार करण्याचे प्रस्तावित आहे. पण, या रस्त्यासाठी आता ६०० नव्हे तर १ हजार २०० वृक्ष कापले जाण्याची शक्यता आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात वृक्षांची कत्तल होणार असल्याची धक्कादायक माहिती महापालिकेच्या प्राथमिक सव्‍‌र्हेत समोर आली आहे. आता महापालिका वृक्ष वाचवण्यासाठी प्रयत्न करते की मेट्रोला रस्ता तयार करण्याची परवागनी देते, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

विकास आराखडय़ानुसार भरतनगर ते तेलंगखेडी असा अमरावती रोडला पर्यायी मार्ग प्रस्तावित आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची सुमारे एक हेक्टर जमीन देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा मार्ग सिमेंटचा बांधण्यात येणार आहे. त्याकरिता मेट्रोने प्रस्तावित मार्गावरील वृक्ष कापण्याची परवानगी महापालिकेच्या उद्यान विभागाला मागितली आहे. पण, महापालिकेने अद्याप मेट्रोला परवानगी दिली नाही.

या मार्गाला बांधण्यासाठी सुमारे ५० ते ६० वर्ष जूनी अशी ५०० हून अधिक वृक्षांची कत्तल करण्यात येणार असल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर उच्च न्यायालयाने दखल घेऊन जनहित याचिका दाखल करून घेतली. त्यानंतर महापालिकेला नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. पण, महापालिकेने अद्याप कोणतेच उत्तर दाखल केले नसून प्रकरणावर पुढील सुनावणी थेट १८ एप्रिलला होणार आहे. दरम्यान महापालिकेच्या उद्यान विभागाने प्रस्तावित रस्ता व तेलंगखेडी परिसरातील वृक्षांचा सव्‍‌र्हे केला. त्यात विकास आराखडय़ानुसार प्रस्तावित रस्ता तयार करण्यासाठी प्रत्यक्षात लहान-मोठी तब्बल १ हजार २०० झाडे कापावी लागणार असल्याचे सव्‍‌र्हेअंती स्पष्ट झाल्याची माहिती ‘लोकसत्ता’ला प्राप्त झाली आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात वृक्षांची कत्तल होणार असल्याने महापालिका प्रशासन चिंतेत असून मेट्रोला परवानगी द्यायची किंवा नाही, या द्विधा मनस्थितीत आहे. पण, अर्जावर निर्णय घेण्याची अंतिम मुदत ही १८ एप्रिल २०१९ असून उच्च न्यायालयाची पुढील सुनावणीही त्याच दिवशी आहे. त्यामुळे महापालिकेच्या निर्णयाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात महापालिकेचे उद्यान अधीक्षक अमोल चोरपगार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वरिष्ठांशी परवानगी घेऊन माहिती देतो असे सांगितले.

हा रस्ता विकास आराखडय़ात आहे. मेट्रोने सादर केलेल्या पहिल्या प्रस्तावात एक हजारांवर वृक्ष बाधित होत आहेत. ही संख्या खूप अधिक असून स्थानिक नागरिकांचा त्याला विरोध आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात एक जनहित याचिकाही दाखल आहे. त्यामुळे महापालिकेने कमीत कमी वृक्ष बाधित होतील, याकरिता दोन नवीन पर्यायांचा विचार केला आहे. दुसऱ्या पर्यायात १ हजार ४०० वृक्ष बाधित होत आहेत. पण, ते लहान वृक्ष असून ही हानी टाळण्यासाठी त्या आकाराच्या झाडांचे दुसरीकडे वृक्षारोपण करणे शक्य आहे तर तिसऱ्या पर्यायात ५०० वृक्ष बाधित होत असून ती जागा महाराष्ट्र राज्य मत्स्य व पशू विज्ञान विद्यापीठाची (माफसू) आहे. हे सर्व पर्याय उच्च न्यायालयासमोर ठेवण्यात येतील व न्यायालयाच्या आदेशानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

– अभिजित बांगर, महापालिका आयुक्त.