लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रपूर : वरोरापासून २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या माजरी येथे महाप्रसाद खाल्ल्याने जवळपास १२५ लोकांना विषबाधा झाली असून, यापैकी एक जण मृत्यू पावला आहे. सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. विषबाधा झालेल्या ६ पुरुष, ३० महिला व २४ लहान मुलांचा समावेश आहे.

याबाबत प्राप्त माहितीनुसार असे कळते की, नवरात्रीनिमित्त माजरी येथील कालीमाता मंदिर येथे शनिवार १३ एप्रिल रोजी शनिवारला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी माजरी येथील नागरिक सहभागी झाले होते. महाप्रसाद घेतल्यानंतर काहींना जुलाब व उलट्या होऊ लागल्या. त्यांनी लगेच माजरी येथील वेकोलीच्या रुग्णालयात धाव घेतली. परंतु, माजरी येथे या रुग्णालयातील बेडची संख्या अपुरी पडल्यामुळे सर्वांना वरोडा येथे उपजिल्हा रुग्णालयात जाण्याच्या सूचना करण्यात आल्या. माजरी येथील विकोलीच्या दवाखान्यात सलाईनचाही साठा अपुरा असल्याने आम्हास उपजिल्हा रुग्णालयात जाण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती काही रुग्णांनी दिली.

आणखी वाचा-जेव्‍हा नवनीत राणांसमोर ‘वारे पंजा…’च्या घोषणा दिल्या जातात…

विषबाधा झालेले भक्त रात्री दीडच्या सुमारास वरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात स्वखर्चाने पोहोचले. या रुग्णांना वरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात पोहोचवण्याची कोणतीही व्यवस्था माजरी येथील वेकोली प्रशासनाने केली नाही हे विशेष. या सर्वांवर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रफुल्ल खुजे यांच्या मार्गदर्शनात त्वरेने उपचार करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ६९ विषबाधाग्रस्तांपैकी सहा जणांना चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून यापैकी गुरुफेन यादव(८९) हा रुग्ण मृत पावल्याचे कळते. यास इतरही आजार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. चंद्रपूर येथे हालविण्यात आलेल्या रुग्णात आर्यन राजपुता (५), अभिषेक वर्मा (५), आशय राम उवर्ष, सोमय्या कुमार दीड वर्ष, देवांश राम अडीच वर्ष व गुरु फेन यादव (८०) या जणांचा समावेश आहे. विषबाधा झालेल्यांपैकी माजरी येथे प्राथमिक उपचार केंद्र येथे १० जण, वेकोलीच्या रुग्णालयात २५ ते ३० जण दाखल असून काहीजण चंद्रपूर व वणी येथे गेल्याची माहिती आहे. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा-नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान

उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रफुल्ल खुजे यांच्या मार्गदर्शनात डॉक्टर अंकुश राठोड, डॉक्टर आकीब शेख, डॉक्टर आकाश चिवंडे या वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत रुबीना शेख, प्रणाली अलोणी, शीतल राठोड, अश्विनी बागडे, राखी पचारे, प्रदीप गायकवाड, प्रशांत सातकर, रोहिणी आत्राम, शरद घोटकर, माधुरी बावणे, विजू उईके, सागर कपाटे, सतीश येडे, समीर, अमोल भोंग यांनी विषबाधा झालेल्या रुग्णांवर त्वरेने उपचार केले. वरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक कटारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रतीक बोरकर यांनी आज सकाळी भेट दिली व रुग्णांची आस्तेने चौकशी केली. सध्या उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांची संख्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टर आकाश चिवंडे यांनी दिली.

महाप्रसादामध्ये वरण-भात, भाजी, पोळी व बुंदी या पदार्थांचा समावेश होता. महाप्रसादातील केवळ बुंदी खाणाऱ्यांनाही विषबाधा झाल्याने ही विषबाधा बुंदीतूनच झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेने आपल्याला अतिशय दुःख झाले आहे, असे नमूद करीत राज्याचे चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मृत व्‍यक्‍तीच्‍या परिवाराच्‍या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 125 people poisoned because of mahaprasad one is dead six people are serious rsj 74 mrj