लोकसत्ता टीम
चंद्रपूर: जानेवारी ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत जिल्ह्यात एकूण ५३४ अपघातांची नोंद झाली असून २३३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. जिल्ह्यात झालेल्या एकूण अपघातांपैकी फक्त दुचाकीच्या अपघातांची संख्या २७५ आहे. यात १२९ जण मृत्युमुखी पडले आहे. दुचाकीवर हेल्मेट घातले असते तर कदाचित मृत्युचा आकडा कमी होऊ शकला असता. त्यामुळे दुचाकीस्वारांनो, स्वत:च्या व कुटुंबाच्या सुरक्षेसाठी कृपाकरून हेल्मेट घाला, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ता सुरक्षा समितीचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरूगानंथम एम., अतिरिक्त पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, सा.बा. विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, मुकेश टांगले, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक श्री. जिचकार, वाहतूक निरीक्षक प्रवणीकुमार पाटील, राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक स्मिता सुतावणे, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण आदी उपस्थित होते.
आणखी वाचा-कंत्राटी भरती करणाऱ्या कंपन्या भाजप नेत्यांच्या, अनिल देशमुख म्हणाले ‘जातनिहाय सर्वेक्षण…’
दुचाकीने वाहतूक करतेवेळी हेल्मेट घालणे अतिशय महत्वाचे आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, त्यामुळे आपण स्वत: तर सुरक्षित राहतोच, मात्र आपले कुटुंबसुध्दा सुरक्षित राहू शकते. अपघात टाळण्यासाठी जिल्ह्यातील मुख्य रस्त्यांची सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस विभाग आणि उप-प्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्त पाहणी करावी. तसेच त्रृटी किंवा उणिवा असल्यास तत्परतेने त्या पूर्ण कराव्यात. जेणेकरून वाहतूक करतांना नागरिकांना त्रास होणार नाही. रस्त्यावर वारंवार खड्डे पडणार नाही, याबाबत कामाचे योग्य नियोजन करावे. खड्डे पडत असलेल्या रस्त्यांची दर्जेदार आणि कायमस्वरूपी दुरूस्ती करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील टोल नाक्यावर तिनही विभागांनी संयुक्त पाहणी करून वाहतुकीचे नियम, रस्त्याची वेगमर्यादाबाबतचे फलक, सुरक्षित वाहतुकीबाबत दृकश्राव्य माध्यमातील ऐकू येणा-या सुचना आदींची तपासणी करावी. जिल्ह्यात किंवा शहरात ज्या ठिकाणी सिग्नल व्यवस्था आहे, त्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग अतिशय सुस्पष्ट दिसली पाहिजे. जिल्ह्यात निश्चित करण्यात आलेले ब्लॅकस्पॉट व संभाव्य ब्लॅकस्पॉट ठिकाणांना पोलिस, सार्वजनिक बांधकाम आणि उप-प्रादेशिक परिवहन विभागाने भेट द्यावी. अपघात टाळण्यासाठी ब्लॅकस्पॉटवर काय उपाययोजना करण्यात येत आहे, त्याचा अहवाल पुढील बैठकीत सादर करावा, अशा सुचनाही जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.
आणखी वाचा- Monsoon Update: मान्सूनच्या परतीचा प्रवास १० ऑक्टोबरपासून
सादरीकरण करतांना उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी सांगितले की, सन २०२१ मध्ये जिल्ह्यात एकूण ७१८ अपघात झाले होते. त्या तुलनेत सन २०२२ मध्ये अपघातांची संख्या ४७४ होती. चालू वर्षी २०२३ मध्ये मात्र पहिल्या ८ महिन्यात अपघातांची संख्या ५३४ पर्यंत पोहचली आहे. यावेळी जिल्ह्यातील नवीन ब्लॅकस्पॉट, पोलिस आणि परिवहन विभागाने केलेली कार्यवाही, आवश्यकता असलेल्या रस्त्यावर गतिरोधक लावणे, रस्ता सुरक्षा अभियान व त्यावरील उपाययोजनेसाठी लागणा-या खर्चास मान्यता देणे, रस्त्यावरील जड वाहने हटवून नो-पार्किंग झोन घोषित करणे आदींबाबत चर्चा करण्यात आली.