भंडारा : मंगळवारपासून सुरू झालेल्या दहावी- बारावी परीक्षेत १० मिनिटे अतिरिक्त मिळणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णयराज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेला असताना भंडारा शहरातील दोन परीक्षा केंद्रावर मात्र विद्यार्थ्यांकडून १० मिनिटांच्या आधीच पेपर घेण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांचे काही प्रश्न लिहून व्हायचे असल्याने त्यांनी रडारड सुरू केली. तर दुसऱ्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी गोंधळ घातल्यानंतर १० मिनिटांसाठी पेपर पुन्हा देण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विद्यार्थी जीवनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेल्या बारावीच्या परीक्षेला मंगळवार दि. ११ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षेसाठी तयारी पूर्ण केली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर ३० मिनिटे आधी पोहोचणे अनिवार्य असून शेवटी १० मिनिटे अतिरिक्त दिली जाणार आहेत. दुपारी २ पर्यंत पेपरचा वेळ असेल तर १० मिनिटे अतिरिक्त अर्थात विद्यार्थ्यांना २.१० पर्यंत पेपर सोडवता येणार आहे. यात जर राहिले असेल तर ते त्याला पूर्ण करता येईल, ही सुविधा दिली आहे. शिक्षण मंडळाचा महत्वाचा निर्णय असताना भंडारा शहरातील दोन परीक्षा केंद्रावर मात्र या नियमाला धाब्यावर बसविण्यात आले.

गांधी विद्यालय नगर परिषद शाळा तसेच जिजामाता माध्यमिक विद्यालय या दोन शाळेत बारावी बोर्डाचे परीक्षा केंद्र होते. ११ वाजता विद्यार्थ्यांच्या हाती पेपर आले. मात्र २ वाजून १० मिनिटांनी पेपर घेण्यासंदर्भात नियम असताना २ वाजताच विद्यार्थ्यांकडून पेपर घेण्यात आले. १० मिनिटे वेळ असल्याचे विद्यार्थी सांगू लागले मात्र त्यांचे कुणीही ऐकले नाही. अखेर बाहेर आल्यावर विद्यार्थ्यांची रडारड सुरू झाली. विद्यार्थ्यांचे काही प्रश्न सोडवून व्हायचे असल्याने त्यांचे नुकसान झाले. या केंद्रावर पाण्याची सोय सुध्दा नसल्याचे काही विद्यार्थिनींनी सांगितले. तर जिजामाता परीक्षा केंद्रावर १० मिनिटांआधी केंद्र संचालकांनी पेपर घेताच विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. ही बाब त्यांनी पर्यावेक्षिकेच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांना १० मिनिटांसाठी पुन्हा पेपर देण्यात आले.

या दोन परीक्षा केंद्रावर असलेल्या केंद्र संचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत शिक्षणाधिकारी माध्यमिक रविंद्र सलामे यांना विचारणा केली असता याबाबत माहिती नसून माहिती घेऊन सांगतो असे त्यांनी सांगितले.

बारावीच्या परीक्षेला पहिल्याच दिवशी जिल्ह्यात एकूण १६ हजार ८२७ विद्यार्थी उपस्थित होते तर २३३ विद्यार्थी अनुपस्थित होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत जिल्ह्यात ६५ केंद्रावर बारावीचे १७ हजार ६० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. मात्र इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला २३३ विद्यार्थ्यांची अनुपस्थिती असल्याने १६ हजार ८२७ विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिली. परीक्षेवर नियंत्रणासाठी ९ परीरक्षक केंद्र नियुक्त केली आहे.