नागपूर : राज्यात गेल्या काही वर्षात रेल्वे अपघातात तब्बल १३ वाघ मृत्यूमुखी पडले आहेत. आतापर्यंत रेल्वेच्या धडकेत हत्तीच्या मृत्यूची वाढती आकडेवारी समोर येत होती. आता मात्र, महाराष्ट्रात महामार्गांसह रेल्वेसारख्या रेषीय पायाभूत सुविधांमुळे वाघांसह इतरही वन्यप्राण्यांच्या मृत्यूची संख्या वाढत आहे. महामार्ग, रेल्वे यासारख्या जंगलाला लागून असणाऱ्या रेषीय प्रकल्पांना मान्यता मिळण्याचे प्रमाण अलीकडच्या काही वर्षात वाढले आहे. महामार्गांवर थोड्याफार शमन उपाययोजना केल्या जातात. मात्र, रेल्वेमार्गावर वन्यप्राण्यांसाठी शमन उपाययोजनांबाबत गांभीर्याचा अभाव आहे. मुख्य मार्गावर रेल्वेचा वेग ताशी १३० किलोमीटरपर्यंत पोहोचला आहे. जंगलालगतच्या किंवा जंगलातून जाणाऱ्या रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या गाडीचा वेग ताशी २५ ते ३० किलोमीटपर्यंत मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. परंतु, ही वेगमर्यादा पाळली जात नाही.

शुक्रवारी भंडारा वनविभागाअंतर्गत नाकाडोंगरी वनक्षेत्रात तुमसर ते तिरोडी या रेल्वेमार्गावर रेल्वेच्या धडकेत वाघीण गंभीर जखमी झाली. यात तिची शेपटी तुटली आणि मागच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली. रेल्वेचा वेग अधिक नव्हता. चालकाला समोर काहीतरी असल्यासारखे दिसल्याने त्याने ‘इमर्जन्सी ब्रेक’ दाबला. चालकाचा सहकारी खाली उतरला, पण त्याला काही दिसले नाही. त्यामुळे चालकाने पुन्हा रेल्वे समोर नेली. स्थानकावर गेल्यानंतर चालक व त्याचा सहकारी त्याठिकाणी आले. त्यावेळी त्यांना वाघाची शेपटी तुटलेली दिसली. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस व वनविभागाला माहिती दिली. या वाघिणीला गोरेवाडा येथे उपचारासाठी आणले, असे भंडारा वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल गवई यांनी सांगितले.

हेही वाचा…खळबळजनक! पेट्रोल टाकून उमेदवाराचे वाहनच पेटविले…

आकडेवारी काय सांगते

रेषीय पायाभूत सुविधांमुळे होणाऱ्या वन्यप्राण्यांच्या मृत्यूचा मागोवा घेणारे ‘रोडकिल्स इंडिया’ हे भारतातील पहिले नागरिक विज्ञान प्लॅटफॉर्म आहे. या संस्थेच्या आकडेवारीनुसार, राज्यात २०१३ मध्ये दोन, २०१८ मध्ये तीन, २०२१ मध्ये एक, २०२२ मध्ये दोन, २०२३ मध्ये दोन तर २०२४ मध्ये तीन वाघ मृत्युमुखी पडले आहेत.

अनेक जनावरांचा मृत्यू

विदर्भातील रेल्वे रुळांवर उपाय न केल्याने अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही वर्षात १२ वाघ मृत्युमुखी पडले. आता हा वाघ जखमी झाला आहे. रेल्वेने नुसते पैसे देण्याऐवजी शमन उपाययोजना तातडीने करणे अत्यावश्यक आहे. भूयारी मार्ग, कुंपण यासारख्या शमन उपाययोजना होईपर्यंत संवेदनशील भागात रेल्वेचा वेग मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. – शीतल कोल्हे, रोडकिल्स इंडिया.

हेही वाचा…‘इन्हे’ कोन नही जानता अमित शहा ‘हे’ आवाहन करण्यास विसरले

शमन उपाययोजनांची गरज

महामार्गांवरच नाही तर रेल्वेमार्गांवरदेखील शमन उपाययोजना आवश्यक आहेत. वाघ आता गाभा क्षेत्रातच नाही तर प्रादेशिक आणि इतर वनक्षेत्रातही आहेत. अशावेळी संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. त्यातही वाघीणीचा मृत्य झाला तर जैवविविधतेचे नुकसान अधिक होते. -शाहीद खान, मानद वन्यजीव रक्षक, भंडारा