नागपूर : आठवीत शिकणाऱ्या मुलीने पोटात दुखत असल्याची तक्रार आईकडे केली. आईने तिला डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान केले. त्यामुळे आईच्या पायाखालची जमीन सरकली. आईने आस्थेने चौकशी केली असता तिने प्रियकराबाबत माहिती दिली. आईच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसांनी मुलीच्या प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
जयेश नरेश गभने (२१, रा. वानाडोंगरी, एमआयडीसी) असे आरोपी प्रियकाराचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ वर्षीय पीडित मुलगी ही आठव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. ती वानाडोंगरीतील एका शिकवणी वर्गाला जात होती. शिकवणी वर्गाच्या बाजुच्या इमारतीत आरोपी जयेश गभने हा युवक राहतो. तो बी.ए. द्वितीय वर्षाचे शिक्षण घेतो. दोघांची ओळख झाली. मुलाने तिला अभ्यासात मदत करण्याचे आमिष दाखवून तिचा मोबाईल क्रमांक घेतला. काही दिवसांतच दोघांचे सूत जुळले. दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. जयेशने गेल्या सहा महिन्यांपूर्वी एका निर्माणाधीन इमारतीच्या परिसरात नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तो तिचे वारंवार लैंगिक शोषण करीत होता.
त्यातून ती तीन महिन्यांची गर्भवती झाली. मंगळवारी मुलीने पोट दुखत असल्याची तक्रार आईकडे केली. आईने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, बुधवारी तिने आईकडे पुन्हा तक्रार केल्यामुळे आईने तिला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी तपासणी करुन मुलगी तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. तिच्या आईला धक्का बसला. आईने मुलीचा कसून चौकशी केली असता जयेश गभने याचे नाव समोर आले. त्यामुळे आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरुन जयेशविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करुन अटक केली.
जयेशला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. साहेब…माझे तिच्यावर प्रेम आहे… आरोपी जयेश गभने याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल होताच पोलिसांचे एक पथक त्याला शोधण्यास गेले. तासाभरात जयेशला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. ‘साहेब…माझे तिच्यावर खरे प्रेम आहे..तिच्याशी मला लग्न करायचे आहे…’ असे तो पोलिसांना तो सांगू लागला. अल्पवयीन असलेल्या मुलीशी बळजबरी शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्याला माहिती देण्यात आली. त्यानंतर त्याला अटक करुन न्यायालयात उपस्थित करण्यात आले.