नागपूर : गेल्या काही महिन्यांपासून नागपुरातील महिला-तरुणींचे पलायन किंवा बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या आठ महिन्यांत शहरातून १ हजार ३०० पेक्षा जास्त महिला बेपत्ता झाल्या. तब्बल १४८ महिलांचा अद्यापही थांगपत्ताही लागला नाही, हे विशेष. घरातून बेपत्ता झालेल्या महिलांमध्ये प्रियकरासोबत पळून जाणे किंवा अनैतिक संबंधातून घर सोडणाऱ्या महिलांचा सर्वाधिक टक्का असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नागपूर हिट अ‍ॅण्ड रन : नाट्यमय घडामोडीनंतर अखेर रितिका मालूला अटक

नागपूर पोलिसांच्या निष्किय धोरणामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच आता महिला सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरात गुन्हेगारांची हिम्मत वाढत असून अवैध धंद्यांना ऊत आला आहे. पोलीस आयुक्तांनी वारंवार सूचना दिल्यानंतरही ठाणेदार अवैध धद्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून शहरातून महिला बेपत्ता आणि पलायन केल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी ते ऑगस्ट २०२४ पर्यंत १ हजार ३१० महिला बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. बेपत्ता झालेल्या महिलांमध्ये अनैतिक संबंध किंवा प्रेमप्रकरणाचा सर्वाधिक समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तर काही महिला कुटुंबियांच्या रागावर किंवा कुटुंबियांचा त्रास सहन न झाल्याने घर सोडण्याचा निर्णय घेतात. तरुणींच्या बेपत्ता होण्यामागे प्रेमविवाह करण्यासाठी प्रियकरासोबत पलायन करणे किंवा नोकरीच्या शोधात घर सोडल्याचे कारण समोर आले आहे. महिला बेपत्ता झाल्याची तक्रार घेण्यास पोलीस टाळाटाळ करतात. तक्रार घेतल्यानंतर प्रकरण प्रलंबित ठेवतात. महिलांच्या शोधासाठी पुरेपूर प्रयत्न पोलीस करीत नसल्याच्या तक्रारी कुटुंबिय करीत असतात. त्यामुळे पोलिसांनीही अशा तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन बेपत्ता महिलांचा शोध घेण्यात प्राधान्य द्यायला हवे, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा >>> देहव्यवसायाच्या दलदलीतून बाहेर पडत ती पुन्हा संसारात रमली

अनेक बेपत्ता महिला वाममार्गाकडे

प्रेमाचे आमिष दाखवून प्रियकरासोबत पलायन करुन गेलेल्या अनेक तरुणी-महिलांची फसगत होते. महिन्याभरात प्रेमाचा रंग उडतो. आर्थिक चणचण भासल्यानंतर दोघांचेही जगणे खडतर होते. पळून गेलेल्या तरुणींना बदनामीच्या भीतीपोटी कुटुंबीय पुन्हा घरात घेत नाहीत. त्यामुळे अनेकदा पळून गेलेल्या तरुणींना नाईलाजाने देहव्यवसायाचा मार्ग निवडावा लागतो, अशी माहिती समोर आली आहे.

तीन वर्षांत बेपत्ता झालेल्या महिला

वर्षे      बेपत्ता महिला

२०२१  – १६५३

२०२२  – १८०९

२०२३  – १८१६

२०२४ (ऑगस्ट) – १३१०

शहरातून बेपत्ता झालेल्या महिलांच्या तक्रारींकडे गांभीर्याने बघितल्या जाते. पथके तयार करुन तांत्रिक पद्धतीने तपास करीत त्या महिलांचा शोध घेण्यात येतो. त्यामुळे बेपत्ता महिलांना शोधण्यात मोठ्या प्रमाणात यश येते. – ललिता तोडासे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथक)

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1300 women missing from nagpur in 8 months over love affairs and immoral relationships adk 83 zws