लोकसत्ता टीम
अकोला : जलयुक्त शिवार अभियान २.० साठी जिल्ह्यात १३१ गावांमध्ये जलसंधारण उपचाराची कामे प्रस्तावित करण्यात आली असून जिल्हास्तरीय समितीने १३१ गावांमधील १६७४ कामांच्या गाव आराखड्यास मान्यता दिली आहे. याअंतर्गत १३१ कोटी ७० लक्ष ५४ हजार रुपये निधीतून जलसंधारण उपचाराची कामे होणार आहेत. या कामांची अंदाजपत्रके तयार करून तात्काळ प्रशासकीय मान्यता घेण्याची प्रक्रिया राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी यंत्रणेस दिल्या आहेत.
आराखड्यानुसार तालुकानिहाय कामांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार अकोला तालुक्यातील १७ गावांमध्ये कामांची संख्या १९३ आहे. त्याची प्रस्तावित किंमत १६ कोटी ९२ लाख ३१ हजार रुपये आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील १९ गावांमध्ये कामांची संख्या ३६२ असून १८ कोटी ६८ लाख ६० हजाराचा निधी प्रस्तावित आहे. अकोट तालुक्यात गावांची संख्या २२ असून ६७ कामे केली जाणार आहेत. त्यासाठी २५ कोटी ८० लाखांचा निधी प्रस्तावित आहे. तेल्हारा तालुक्यातील २५ गावांमध्ये २०० कामे असून त्यासाठी ३३ कोटी ५५ लाख ८० हजार रुपये प्रस्तावित आहेत. मूर्तिजापूर तालुक्यातील गावांची संख्या २७ असून कामांची संख्या ४१६ आहे. त्यासाठी १५ कोटी ४२ लाख १९ हजार रुपये प्रस्तावित आहेत. बाळापूर तालुक्यातील आठ गावांमधील १३३ कामांसाठी ७ कोटी ४० लाख २७ हजार रुपये, तर पातूर तालुक्यातील गावांची संख्या १३ असून ३०३ कामांचे नियोजन आहे. त्यासाठी १३ कोटी ९१ लाख ३७ हजार रुपये प्रस्तावित आहेत. एकूण १३१ गावांमध्ये १६७४ कामे प्रस्तावित असून त्याची किंमत १३१ कोटी ७० लाख ५४ हजार रुपये आहे. या सर्व आराखड्यास जिल्हास्तरीय समितीने मंजुरी प्रदान केल्याची माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी हरी गीते यांनी दिली.