चंद्रपूर : एका अल्पवयीन गरीब मुलीला जेवण, निवास व पैशाचे आमिष दाखवून तिला वेश्याव्यवसायात ओढून तिच्याकडून देहव्यापार करवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे उघडकीस आला आहे.
याप्रकरणी वरोरा पोलिसांनी १४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. दरम्यान यात आता मुलीची अश्लील चित्रफित तयार करून समाज माध्यमावर सार्वत्रिक केल्या प्रकरणी रमेश मेश्राम, महेश जीवतोडे व राकेश शिंदे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या प्रकरणात आणखी बरीच नावे समोर येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – जि. प. भरती! परीक्षा केंद्र कधीही बदलू शकते
विशेष म्हणजे, वेश्या व्यवसाय करणारी ही टोळी असून मागील दाेन ते तीन महिन्यांपासून अल्पवयीन मुलीकडून देहव्यापार करवून घेतला जात होता. वरोरा, भद्रावती येथे ग्राहकाकडून ५०० रुपये घेवून अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते. या प्रकरणी पोलिसांनी २२ वर्षीय महिलेसह ग्राहकांना अटक केली आहे.
आणखी एक आरोपी आधीच कारागृहात आहे. वेश्याव्यवसाय प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता, यादरम्यान दोन एजंट आणि ग्राहकांनी अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केले. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सुरू झालेला हा प्रकार फोन डिटेल्सवरून उघड झाला आहे. या वेश्याव्यवसाय प्रकरणात आणखी ५ ते १० आरोपी सामील असण्याची शक्यता आहे. न्यायालयीन पंचनामा केल्यानंतर आरोपींची ओळख पटणार आहे. अल्पवयीन लैंगिक कायदा, वेश्याव्यवसाय कायद्याच्या कलम २२६/२३, पॉस्को, पिटाअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाात आणखी ग्राहक वेश्याव्यवसायात गुंतले आहेत का, याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी एसआयटी समिती स्थापन केली आहे.
हेही वाचा – नागपूर: गुंगीचे औषध देऊन मुलीवर बलात्कार; गर्भपातही केला
या समितीमध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा आयुष नोपानी, पोलीस स्टेशनचे अमोल कचोरे, दोन महिला पोलीस अधिकारी, सायबर रायटर अशी एकूण आठजणांची एसआयटी समिती स्थापन केली आहे. दरम्यान अश्लील चित्रफित सार्वत्रिक केल्यानंतर आता आणखी बरीच नावे या प्रकरणात समोर येत आहे. पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत.