नागपूर : उन्हाळी सुट्यांच्या काळात प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून पुणे – नागपूर – पुणे दरम्यान १४ अतिरिक्त वातानुकुलित रेल्वेगाड्या चालवण्यात येत आहेत. या विशेष गाडी आठवड्यातून एकदा धावणार आहे. गाडी क्रमांक ०१४३९ साप्ताहिक सुपरफास्ट वातानुकुलीत विशेष गाडी दिनांक २४ मेपर्यंत दर शनिवारला पुणे येथून रात्री ७.५५ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी २.४५ वाजता नागपूरला पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४४० साप्ताहिक सुपरफास्ट वातानुकुलीत विशेष गाडी दिनांक २५ मेपर्यंत दर रविवारला नागपूर येथून दुपारी ४.१५ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी ७.२० वाजता पुण्याला पोहोचेल.ही गाडी दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा आणि वर्धा येेथे थांबते. या गाडीला ८ वातानुकुलित द्वितीय श्रेणी, १० वातानुकुलीत तृतीय श्रेणी, २ गार्ड ब्रेक व्हॅन असे एकूण २० डबे आहेत.
मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन नियमित गाड्यांव्यतिरिक्त आतापर्यंत उन्हाळी विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत.भिवंडी – सांकराईल अनारक्षित साप्ताहिक विशेष गाडीच्या तीन फेऱ्या होतील. गाडी क्रमांक ०११४९ अनारक्षित विशेष ९ एप्रिल ते २३ एप्रिलपर्यंत दर बुधवारी भिवंडी येथून २२:३० वाजता सुटेल आणि सांकराईल माल टर्मिनल यार्ड येथे तिसऱ्या दिवशी दुपारी १:०० वाजता पोहोचेल. या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, रायपुर, बिलासपुर, झारसुगुड़ा, राउरकेला, चक्रधरपुर, टाटानगर आणि खड़गपुर येथे थांबा राहणार आहे. १० सामान्य द्वितीय श्रेणी, २ द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १० पार्सल व्हॅन अशी गाडीची संरचना राहणार आहे.
खडगपूर – ठाणे अनारक्षित साप्ताहिक विशेष गाडीच्या देखील तीन फेऱ्या होणार आहेत. गाडी क्रमांक ०११५० अनारक्षित विशेष १२ ते २६ एप्रिलपर्यंत दर शनिवारी खड़गपुर येथून २३.४५ वाजता सुटेल आणि ठाणे येथे तिसऱ्या दिवशी १०.३० वाजता पोहोचतील. या गाडीला टाटानगर, चक्रधरपुर, राउरकेला, झारसुगुड़ा, बिलासपुर, रायपुर, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी आणि कल्याण येथे थांबा राहील. १० सामान्य द्वितीय श्रेणी, २ द्वितीय श्रेणीसह- गार्ड ब्रेक व्हॅन आणि १० पार्सल व्हॅन अशी गाडीची संरचना राहणार आहे. अनारक्षित विशेष गाड्या आणि कोचसाठी तिकिटे सामान्य शुल्कात यूटीएसद्वारे बुक करता येतील.