यवतमाळ : उमरखेड येथे एका बालिकेवर सराईत गुन्हेगाराने अत्याचार केला. दरम्यान भाजपाशी संबंधित डॉ. सायली शिंदे यांनी प्रसिद्धी आणि सहानुभूती मिळवण्यासाठी पीडित बालिकेच्या सांत्वनपर भेटीचे छायाचित्र व चित्रफीत समाजमाध्यमांत सार्वत्रिक केली. या प्रकरणी उमरखेड पोलिसांनी डॉ. शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती. न्यायालयाने शिंदे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत त्यांची रवानगी कारागृहात केली आहे.
चार दिवसांपूर्वी उमरखेड तालुक्यातील एका ११ वर्षीय बालिकेला वाटेत अडवून दुचाकीवरून शाळेत सोडून देण्याचा बहाणा करत विकृत नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर शाळेत न सोडता निर्जनस्थळी नेत त्याने तिच्यावर पाशवी अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी अजिज खान मोहमद खान पठाण (४९) रा. नागापूर रुपाळा, ता. उमरखेड असे या आरोपीस अटक केली. अत्याचार प्रकरणात कुठल्याही पीडित बालिकेचे अथवा महिलेचे नाव पुढे येणार नाही, अथवा कुणी तसा प्रयत्न करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. मात्र प्रसिद्धीच्या हव्यासापोटी डॉ. सायली शिंदे यांनी त्या पीडित बालिकेचे भेटीदरम्यानचे फोटो समाज माध्यमांत व्हायरल केले. ही बाब स्थानिक व्यवसायिक लक्ष्मीकांत मैड यांच्या लक्षात येताच त्यांनी उमरखेड पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली.
हेही वाचा – नागपूर : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अभिवचन रजेवर कारागृहातून सुटला अन् फरार झाला, पण…
पोलिसांनी तक्रारीची दखल घेत सायली शिंदे यांच्या विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण आणि अन्य कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच उमरखेड येथील राहत्या घरून त्यांना अटकही करण्यात आली होती. दरम्यान, उमरखेड पोलिसांनी डॉ. सायली शिंदे यांना पुसद येथील न्यायालयात हजर केले. या वेळी न्यायालयाने शिंदे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत त्यांची रवानगी कारागृहात केली. न्यायालयीन कोठडी सुनावताच उमरखेड पोलिसांचे पथक त्यांना यवतमाळ येथील जिल्हा कारागृहात आणत असताना ऐनवेळी वाटेत डॉ. शिंदे यांची प्रकृती खालावली. त्यामुळे शिंदे यांना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार आटोपल्यानंतर शिंदे यांची रविवारी कारागृहात रवानगी करण्यात आली. या घटनेने उमरखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे.