नागपूर : ‘व्हिडिओ लाईक्स’च्या नावाखाली चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका युवकाची १४ लाखांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी युवकाच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. अलिकडे ‘लाईक आणि सबस्क्राईब’ करण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केली जात आहे.
यशोधरानगर पोलीस ठाण्याअतंर्गत भिलगाव येथील रहिवासी फिर्यादी आशिष दवंडे (२७) घरी असताना सायबर गुन्हेगाराने ‘व्हॉट्सअॅप’वरून दोन आयडी पाठविल्या आणि घरबसल्या ‘पार्ट टाईम जॉब’चे आमिष दाखवले. चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यामुळे आशिषने होकार दिला.
दिलेल्या अवधीत काम पूर्ण केल्याने आशिषला परतावा मिळाला. लाभ होत असल्याने आशिष रक्कम गुंतवत गेला. आशिषचा विश्वास संपादन करण्यासाठी सायबर गुन्हेगाराने वेळोवेळी आर्थिक लाभ दिला. त्यामुळे आशिषने मोठी गुंतवणूक केली. वेगवेगळ्या बँक खात्यातून १४ लाख ४९ हजार रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. यानंतर मात्र, परतावा नव्हेच तर मूळ रक्कमही मिळाली नाही.
हेही वाचा – वर्धा : उद्धव ठाकरे यांचा सुसाट निघालेला ताफा एकाएकी थांबला अन्..
सायबर गुन्हेगाराने संपर्कही तोडला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे आशिषच्या लक्षात आले. त्याने सायबर पोलीस ठाणे गाठून सारा प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.