अकोला : वाशीम जिल्ह्यात पूर्ववैमनस्य व विकृत मानसिकतेतून १४ वर्षीय मुलाची आरोपींनी निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पोलीस तपासात उघड झाली आहे. गुन्हा लपवण्यासाठी आरोपींनी मुलाचे अपहरण झाल्याचा बनाव रचला होता.गेल्या सात दिवसांपासून अपहृत मुलाचा शोध घेतला जात असतांना शुक्रवारी त्याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. १४ वर्षीय मुलाच्या हत्या प्रकरणामुळे वाशीम जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
वाशीम जिल्ह्यातील बाभुळगांव येथील संतोष सादुडे यांनी अनसिंग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांचा मुलगा अनिकेत संतोष सादुडे (१४) हा गावातील लग्नाच्या मिरवणुकीत नाचायला गेला होता. रात्रीचे दोन वाजल्यानंतरही तो घरी परतला नाही. गावात शोध घेतल्यावरही तो दिसून आला नाही. त्याचवेळी संतोष सादुडे यांना घराजवळ एक पाच पानाचे पत्र मिळाले. त्यामध्ये अनिकेतचे अपहरण केले असून ६० लाखाची मागणी केली. मागणी पूर्ण न केल्यास अनिकेतला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. १८ अधिकारी व अंमलदार यांच्या तपास पथकाने सर्व दिशांनी तपास केला. तपासदरम्यान प्रणय पद्मणे, शुभम इंगळे यांचेवर पह ल्या दिवसापासूनच पोलिसांना संशय असल्याने त्यांच्यावर लक्ष ठेऊन सखोल चौकशी केली. वारंवार केलेल्या चौकशीत त्यांचा जबाब, हालचाली, कृतीमध्ये विसंगती आढळून आली.
निष्कर्ष काढून अत्यंत बारकाईने व तांत्रिक विश्लेषणासह चौथ्यांदा विचारपूस केली. त्यावर प्रणय पद्मणे याने गुन्ह्याची कबुली दिली. १२ मार्चला रात्री १२ वाजताच्या सुमारास अनिकेत याला शुभम इंगळे याच्या मदतीने मिरवणुकीमधून आमिष दाखवून बाभुळगांव फाटा शेतशिवारात नेले. १३ मार्चला मध्यरात्री गळा आवळून त्याची हत्या केली.
आरोपीने हे कृत्य पूर्ववैमनस्य व विकृत मनोवृत्तीतून केले. आपले गैरकृत्य उघउ होऊ नये व पोलीस तपासाची दिशा भरकटवून सर्वत्र संभ्रम निर्माण होण्यासाठी आरोपींनी अपहरण व खंडणी मागणीचा बनाव केला. तपासादरम्यान अनिकेत सादुडे याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. सखोल तपास आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हा उघडकीस आणण्यात वाशीम पोलिसांना यश आले. वाशीम जिल्ह्यातील या प्रकारची पहिलीच घटना असल्याने पोलीस प्रशासनासमोर तपास करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते.