लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : मोमीनपुऱ्यात एका युवकाचा खून करणाऱ्या आरोपीने कारागृहातून सुटून आल्यानंतर १४ वर्षीय मुलीचे अपहरण केले. तिला एका मित्राच्या घरात डांबून सलग दोन दिवस बलात्कार केला. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

राहुल श्रीकृष्ण गायकवाड (वय २१, रा. गरीब नवाजनगर, यशोधरानगर) असे अटक करण्यात आलेल्या कुख्यात आरोपीचे नाव आहे. राहुल हा कुख्यात गुन्हेगार असून त्याने अल्पवयीन असतानाच खून केला होता. त्यानंतर तो अनेक गुन्ह्यात सहभागी होता. सध्या तो भाजीपाल्याचा व्यवसाय करतो, तर पीडित १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आठव्या वर्गात शिकते. ती जरीपटका परिसरात राहते. आरोपीची अल्पवयीन मुलीशी मागील १५ दिवसांपूर्वी ओळख झाली. १७ मे रोजी तिच्या घराशेजारी लग्न होते. तेथे आरोपी राहूल आला होता. तेथे काही वेळपर्यंत थांबल्यानंतर तो पीडित मुलीला भेटला.

आणखी वाचा-वर्धा : तहानेने वन्यप्राणी व्याकूळ, आचारसंहितेमुळे रखडले चंद्रकोरी तळे

आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून फूस लाऊन पळवून नेले. तिला जरीपटका परिसरात एका मित्राच्या घरी ठेवले. तिच्यावर सलग दोन दिवस बलात्कार केला. त्यानंतर तिच्या आईला मुलगी घरी न आल्यामुळे काळजी वाटली. तिने मुलाचा शोध घेतला. मात्र, ती आढळून आली. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रदीप काईट यांनी आरोपी राहुल विरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. तांत्रिक तपास करून त्याला मित्राच्या घरातून अटक केली. त्यावेळी पीडित मुलीलाही पोलिसांनी ताब्यात घेऊन आईवडिलांकडे सोपवले. आरोपी राहुल लहानपणापासून गुन्हेगार आहे. अल्पवयीन असताना त्याने मोमिनपुरातील एका युवकाचा खून केला होता. परंतु, अल्पवयीन असल्यामुळे तो जामिनावर बाहेर आला. त्यानंतर त्याने एकापाठोपाठ अनेक गुन्हे केले. अल्पवयीन मुलीला आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्याच्या सवयीचा आहे. त्याने आतापर्यंत ५ ते ७ मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली.

आणखी वाचा-जलसंकटाची चाहूल; मोठ्या, मध्यम धरणात पाच टक्के जलस्तर खालावला

मुलीवर लैंगिक अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने वाडी परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला जाळ्यात अडकवले. जवळपास ५ महिन्यांपासून तो तिचे शोषण करीत होता. शेवटी कंटाळून पीडितेने वाडी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. अनूप सुरेश घटी (२१) रा. निपानी सोनेगाव असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

पीडिता आणि आरोपीत जुनी ओळख आहे. याचा फायदा घेत अनूपने पीडितेला जाळ्यात अडकवले. जानेवारी महिन्यात पीडिता एकटी असताना तो तिच्या घरी आला. लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी जबरीने लैंगिक संबंध प्रस्थापित केले. तेव्हापासून तो पीडितेचे सतत शोषण करीत होता. गत गुरुवारी सायंकाळी तो पीडितेच्या घरी आला. घरी कोणी नसल्याची संधी साधून तिच्याशी जबरीने लैंगिक संबंध प्रस्थापित केले. पीडितेने घटनेबाबत कुटुंबीयांना माहिती दिली. अनूपविरुद्ध पोलिसात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी लैंगिक अत्याचार आणि पोक्सो अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 14 year old girl kidnapped and raped by gangster around 5 to 7 minor girls were trapped adk 83 mrj