लोकसत्ता टीम
नागपूर: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर देशात एक चैतन्य आणि ऊर्जेचे वातावरण निर्माण झाले. अल्पसंख्यांक समाजाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी चुकीची माहिती देण्यात आल्याने त्यांच्यात संघाविषयी गैरसमज होते. आता त्यांच्यातील भीतीचे वातावरण कमी होत आहे. भारतातील १४० कोटी समाज हा हिंदूच आहे. सर्वांचे पूर्वज हे हिंदूच होते, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी सांगितले.
नागपुरात शुक्रवारपासून सुरू झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या निमित्ताने त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर उपस्थित होते. मनमोहन वैद्य म्हणाले , संघाचे कार्य देशभर वाढत असून अनेक तरुण संघाशी जुळत आहेत. संघाच्या संकेतस्थळावर दरवर्षी ‘जॉईन आरएसएस’ म्हणून एक लाख लोकांचे विनंती अर्ज येतात. संघासोबत नव्याने जुळणाऱ्यांसाठी यापुढे तीन दिवस प्रारंभिक वर्ग, सात दिवसाचा प्राथमिक वर्ग आणि पंधरा दिवसांचा संघ शिक्षा वर्ग घेण्यात येणार आहे.
आणखी वाचा- नागपूर : मसाजच्या नावावर तरुणींकडून देहव्यापार, ड्रीम फॅमिली स्पामध्ये ‘सेक्स रॅकेट’
अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला देशभरातून १५०० हून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. ही बैठक निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. संघाचे प्रतिनिधी हे नियमित शाखांमधून निवडले जातात. अठरा वर्षाच्यावरील पूर्णवेळ स्वयंसेवकांमधून यांची निवड होते. ४० शाखांमधून एक प्रतिनिधी निवडला जातो. असे २०३ अखिल भारतीय प्रतिनिधी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय प्रांत संघ चालक, प्रांत कार्यवाह, त्यांचे सहाय्यक असे अखिल भारतीय कार्यकारी मंडळ मंडळाचे ४३५ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. देशातील ४५ प्रांतांमध्ये कार्य विभागाचे ३०० प्रमुख आणि देशभरात जागरणाचे काम करणाऱ्या संघाच्या ३५ पेक्षा अधिक संघटनांचे प्रमुख आणि ४५ महिला प्रतिनिधी बैठकीला उपस्थित राहणे अपेक्षित आहे असे वैद्य म्हणाले.
मागील काही वर्षांपासून संघाच्या विस्तारामध्ये मोठी वाढ झालेली आहे. देशातील ९२२ जिल्ह्यांमध्ये म्हणजेच ९९ टक्के जिल्ह्यात संघाच्या संघाचे शाखा सुरू आहेत, तर ६५९७ तालुका ठिकाणी शाखा आहेत. संघाचे काम वाढत असल्याने दहा ते पंधरा गावांचा समूह घेऊन मंडल तयार करण्यात आले असून ५८९८ मंडळांमध्ये सध्या शाखा सुरू आहेत. सध्या देशात ७३,१७७ नियमित शाखा सुरू आहेत. यात ६० टक्के शाखा ह्या विद्यार्थ्यांच्या तर ४० टक्के शाखा व्यवसायिक आणि नोकरदारांचे आहेत. अकरा टक्के शाखा तरुणांच्या आहेत. त्यामुळे तरुण वर्गाचा सहभाग वाढत असल्याचे दिसून येते. नियमित शाखांशिवाय देशात २७ हजार ७७० साप्ताहिक मिलन शाखा सुरू आहेत असेही वैद्य यांनी सांगितले.
आणखी वाचा- ‘सरसंघचालक मोहन भागवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नजरकैदेत…’ खळबळजनक आरोपाबाबत जाणून घ्या सविस्तर
महिला जागृतीवर भर
महिला वर्गामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी देशातील तेवढेच ४४ प्रांतात ४६० महिला संमेलनांचे आयोजन करण्यात आले आहेत. यामध्ये ५ लाख ६१ हजार महिलांनी सहभाग घेतला. यावेळी राष्ट्रीय विषयांवर जागरण करण्यात आले असून समाज परिवर्तनात महिलांचा सहभाग, सामाजिक क्षेत्रात समोर येऊन काम करणे, भारतीय चिंतनात महिलांचे स्थान अशा चार विषयांवर जागृती निर्माण करण्यात आली.
२२ लाख ठिकाणी राम मंदिराचे कार्यक्रम
राम मंदिर प्रतिष्ठान सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात संघाचा व्यापक जनसंपर्क वाढलेला आहे या निमित्ताने पाच लाख ९८ हजार गावात १९ कोटी ३८ लाख लोकांशी संपर्क झाला. ज्यामध्ये ४४ लाख कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. राम जन्मभूमी प्रतिष्ठान सोहळ्याचा उत्सव देशभरातील २२ लाख ६० हजार ठिकाणी साजरा करण्यात आला. ज्यात सत्तावीस कोटी ९४ लाख लोक सहभागी झाले. यामुळे समाजामध्ये ऊर्जेचे वातावरण निर्माण झालेले आहे. संघ हे संपूर्ण समाजाचे संघटन आहे. शताब्दी वर्ष सुरू होण्याआधी अधिक संघाला अधिक बळकट करण्यावर आमचा जोर असल्याचे वैद्य म्हणाले.