नागपूर : कळमन्यातील फळ व्यापाऱ्याची १५ लाख ३५ हजार रुपयांनी फसवणूक करून दोघांनी ठार मारण्याची धमकी दिली. हा खळबळजनक प्रकार कळमना पोलीस ठाण्याअंतर्गत घडला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. मो. आमीर रजा आणि मो. फैज अशी आरोपींची नावे आहेत.
नेताजीनगर, कळमना येथील रहिवासी फिर्यादी रविनीश पांडे (४२) यांची माँ जगदंबा फ्रूट या नावाने कंपनी असून ते फळाच्या मार्केटमध्ये दलाल म्हणून काम करतात. आरोपी आमीर आणि फैज दोघेही कळमना बाजारात फळ व्यापारी आहेत. बाजारात त्यांचे दुकान आहे. आरोपींच्या मागणीवरून पांडे यांनी ९७ लाख ६४ हजार रुपयांची मोसंबी विक्री केली. त्यापैकी आरोपींनी ८२ लाख २९ हजार परत केले. मात्र, १५ लाख ३५ हजारांसाठी त्यांनी धनादेश दिला. परंतु, दोन्ही धनादेश वटलेच नाहीत. पांडे यांनी पैशासंदर्भात विचारणा केली असता ‘आता आमच्याकडे पैसे नाहीत. जे करायचे ते करून घे’ असे म्हणत ठार मारण्याची धमकी दिली.
हेही वाचा – नागपूर : सुरक्षारक्षकाचा मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न
एकीकडे १५ लाखांची फसवणूक तर दुसरीकडे धमकी यामुळे पांडे घाबरले. त्यांनी पोलीस ठाणे गाठून सारा प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी पांडे यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला असून त्यांचा शोध घेत आहेत.