चंद्रपूर: ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजावी, या उद्देशाने जिल्ह्यात पंचायत विभागाच्या पुढाकारातून १५० वाचनालये तयार करण्यात आली. ग्रामीण भागातील लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, गावागावात वाचनासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, गावात अभ्यासाचे वातावरण निर्माण व्हावे, भविष्यातील संशोधक, वाचक, अधिकारी व आदर्श नागरिक निर्माण व्हावे या प्रमुख उद्देशाने चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात १० याप्रमाणे १५ तालुक्यात १५० वाचनालयाची निर्मिती मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्हा परिषद, पंचायत विभाग व शिक्षण विभाग यांच्या समन्वयातून हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. वाचनालय निर्माण करण्याची चळवळ अविरतपणे सुरु राहावी या उद्देशाने जिल्ह्यात १५० वाचनालये सुरु झाली असून पुढील टप्प्यात समाजकल्याण विभागाच्या पुढाकारातून ४५ वाचनालयाची निर्मिती करण्यात येणार आहे. या वाचनालयाची विशेष बाब म्हणजे, वाचनालयासाठी प्रत्येक गावातील वापरात नसलेल्या शासकीय इमारतींची दुरुस्ती व सुशोभीकरण करून त्यांचे वाचनालय तयार करण्यात आलेले आहे.

हेही वाचा… वर्धा: पावसाळ्यात अशी घ्या काळजी आपल्या ‘टॉमी’ची

पंचायत विभागाच्या माध्यमातून वाचनालयासाठीच्या इमारतींची दुरुस्ती, रंगरंगोटी, कपाट, टेबल खुर्च्या, विजेची सोय, इत्यादी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी जिल्हास्तरावरील १५ वित्त आयोगाच्या निधीच्या माध्यमातून १ कोटी ५० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच वाचनालयात स्पर्धा परीक्षाकरीता लागणारी पुस्तके, अवांतर वाचनाची पुस्तके, लहान मुलांसाठी गोष्टीची पुस्तके आदीकरीता ३५ लक्ष रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे.

हेही वाचा… नागपूर ‘एम्स’मध्ये रुग्णांना लुटण्याची नवीन क्लुप्ती, प्रकरण काय?

ग्रामीण भागातील युवक अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. पण ग्रामीण भागात या मुलांना अभ्यासासाठी हक्काचे ठिकाण नाही, त्यामुळे वाचनालयांची निर्मिती करणे व गावातील वाचनालयाचे बळाकटीकरण करणे गरजेचे आहे. या ध्येयाने या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. गावातील वाचनालये अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी सामाजातील प्रत्येक घटकाने वाचनालय चळवळीत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 150 libraries were created in the district on the initiative of the panchayat department in chandrapur rsj 74 dvr