नागपूर : गेल्या पाच महिन्यांत शहरातून बेपत्ता झालेल्या १५० अल्पवयीन मुलींचा गुन्हे शाखेने शोध घेऊन पालकांच्या स्वाधीन केले. यामध्ये सर्वाधिक मुली हुडकेश्वर, एमआयडीसी आणि कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांच्या अहवालातून समोर आली आहे.
राज्य महिला आयोगाने राज्यातून बेपत्ता होत असलेल्या अल्पवयीन मुली, तरुणी आणि महिलांची संख्या बघता चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे पोलिसांनी गांभीर्य दाखवून बेपत्ता झालेल्या किंवा अपहृत मुलींचा शोध घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाला सतर्क केले होते. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत शहरातून १६३ मुली बेपत्ता किंवा अपहरण झाल्याच्या तक्रारी दाखल होत्या. मानवी तस्करी रोखण्यासाठी एएचटीयूने महाराष्ट्रातच नव्हे तर अन्य राज्यात जाऊन बेपत्ता मुलींचा शोध घेतला. नागपुरातील १५० अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन पालकांच्या स्वाधीन केले. तर १३ अल्पवयीन मुली अद्यापही बेपत्ता आहे.
हेही वाचा – गोंदिया : मुलगा आहे की राक्षस! जन्मदात्रीचा खून केला; बनाव रचला, पण बिंग फुटलेच
बेपत्ता झालेल्या मुलींपैकी सर्वाधिक मुली हुडकेश्वर (१३), एमआयडीसी (१२), कळमना (१०) आणि पारडी, नंदनवन आणि वाडीतून प्रत्येकी ८ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. पोलिसांनी शोध घेतलेल्या मुलींना आपापल्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. बळजबरी पळवून नेणाऱ्या किंवा लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी तरुणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. काही मुलींचे समूपदेशन करून पुन्हा शिक्षणाकडे त्यांचे मन वळविण्यात एएचटीयूला यश आले आहे.
बेपत्ता होण्याची कारणे
बेपत्ता झालेल्यांपैकी अनेक मुली केवळ १४ ते १५ वर्षांच्या आहेत. काही मुलींना तरुणांनी प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्न करण्याचे आमिष दाखवून आईवडिलांच्या ताब्यातून पळवून नेले. काही मुली स्वतःहून प्रियकरासोबत निघून गेल्या. काही मुलींना नातेवाईकांनीच फूस लावून घरातून बाहेर पडण्यास बाध्य केले. तर बऱ्याच मुली शाळकरी असून भविष्याचा कोणताही विचार न करता केवल शारीरिक आकर्षणावर भाळल्यामुळे घरातून निघून गेल्या होत्या, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे.
हेही वाचा – मुंबई ATS कडून अकोला दंगल प्रकरणात गोपनीय चौकशी; शासनाला अहवाल सादर करणार
बेपत्ता झालेल्या मुली, तरुणी, महिला आणि मुलांचा शोध घेण्यासाठी पोलीस सतर्क आहेत. मुली व महिलांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे बेपत्ता झालेल्यांपैकी जवळपास ९७ टक्के मुली शोधण्यात आम्हाला यश आले आहे. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त.