वैद्यकीय शिक्षण खात्याने राज्यभरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाने काढलेल्या त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याअंतर्गत सगळ्या महाविद्यालयांसाठी लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकासह सहाय्यक प्राध्यापकांची दीडशे पदे भरली जाणार आहेत.
हेही वाचा- नागपूर विद्यापीठ परिसराला विज्ञानाच्या पंढरीचे रूप; नवनवीन संशोधनांचे आजपासून महाप्रदर्शन
या पदांंमध्ये प्राध्यापक ४२, सहयोगी प्राध्यापक ४६, सहाय्यक प्राध्यापकांच्या ६२ अशा एकूण १५० पदांचा समावेश आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी सामान्य प्रशासन विभागाकडे गेला आहे. आयुष संचालक कार्यालयाकडून पाठपुरावा सुरू असून मंजुरी मिळताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरतीची प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती आयुष संचालक डॉ. राजशेखर रेड्डी यांनी दिली.
राज्यात सध्या नांदेड, उस्मानाबाद, मुंबई, नागपूर, जळगाव असे पाच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालये आहेत. भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाच्या निरीक्षणात या महाविद्यालयांत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, रुग्णशय्यांसह इतरही काही पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचे बघत पदवी व पदव्युत्तर जागांचे प्रवेश थांबवण्यात आले होते. शासनाची नाचक्की झाल्यावर वैद्यकीय शिक्षण खात्याने प्रतिज्ञापत्र देऊन या त्रुटी दूर करण्याचे आश्वासन आयोगाला दिले. त्यानंतर येथील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. तरीही शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे येथील पदव्युत्तरच्या ८९ जागांवर टांगती तलवार आहे. पदव्युत्तरच्या प्रवेश प्रक्रियेला ३० डिसेंबरपासून सुरुवात झाल्याने या जागा वाचणे कठीन असल्याचा निमाच्या विद्यार्थी फोरमचा दावा आहे. परंतु या जागा वाचणार असल्याचा दावा आयुष संचालक करत आहेत. त्यामुळे या जागांचे नक्की काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.
हेही वाचा- ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात फुलपाखरांच्या १३४ प्रजाती; दहा वर्षांचा अभ्यासानंतर शोधनिबंध प्रकाशित
दीडशे जागा तातडीने भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाची मंजुरी घेत तातडीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून प्रक्रिया केली जाणार आहे, अशी माहिती मुंबई आयुषचे संचालक डॉ.राजशेखर रेड्डी यांनी दिली.