नागपूर : महिलांना कुटुंबियांकडून होणारा त्रास, सासरकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक किंवा महिलांच्या कौटुंबिक समस्यांवर तोडगा काढण्याच्या उद्देशाने भरोसा सेल स्थापन करण्यात आला होता. मात्र, गेल्या आठ वर्षांत तब्बल १५२७ पीडित पुरुषांनी पत्नी किंवा सासरच्या मंडळीबाबत तक्रारी केल्या आहेत. पोलिसांनी महिलांप्रमाणेच त्या पीडित पुरुषांनाही न्याय मिळवून दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील विविध पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचार, पत्नी-पत्नीतील वाद, सासरच्या मंडळीकडून होणारा त्रास किंवा सासरी राहणाऱ्या महिलांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या तक्रारी वाढल्या होत्या. मात्र, पोलीस ठाण्यात थेट गुन्हे दाखल करुन अटक करण्यावर भर दिल्या जात होता. त्यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होत होते. किरकोळ वाद झाल्यानंतरही संसार विस्कळीत होत होते. या सामाजिक समस्येवर तोडगा काढण्यासाठी तत्कालिन पोलीस आयुक्त के. वेंकटेशम् यांनी भरोसा सेलची स्थापना केली. येथे महिला पोलीस अधिकारी, महिला पोलीस कर्मचारी आणि महिला समूपदेशकांची नियुक्ती केली.

समूपदेशनाच्या माध्यमातून कौटुंबिक स्वरुपाच्या तक्रारींची दखल घेण्याचे काम भरोसा सेल करीत होते. भरोसा सेलला वर्षभरात चांगला प्रतिसाद मिळाला आणि पोलिसांनी अनेकांनी तुटण्याच्या काठावर असलेल्या संसाराला सुरळीत करण्यात यश मिळवले. भरोसा सेलला महिलांचे ‘माहेरघर’ असे संबोधल्या जाते. भरोसा सेलमध्ये पीडित महिलांच्याच तक्रारी घेण्यात येत होत्या. कालांतराने पत्नीकडून त्रस्त पुरुष तक्रारदारांनी भरोसा सेलमध्ये लेखी तक्रार करणे सुरु केले. पोलिसांनी महिलांप्रमाणे पुरुषांच्याही तक्रारींची दखल घेतली. तक्रारीवर कारवाई करीत तब्बल १५२७ पीडित पुरुषांनाही न्याय मिळवून देण्याचे कार्य भरोसा सेलने केले.

अशा असतात पुरुषांच्या तक्रारी

पत्नी वारंवार माहेरी जाते, संसारात पत्नीचे आईवडिल अतिहस्तक्षेप करतात, पत्नीचे अनैतिक संबंध आहेत, पत्नी मारहाण करते, मुलांचा सांभाळ करीत नाही, आई-वडिलांना त्रास देते, माहेरी असलेली पत्नी नांदायला येत नाही किंवा पत्नीचे प्रेमप्रकरण सुरु आहे, अशा प्रकारच्या तक्रारी भरोसा सेलमध्ये आल्या आहेत. अशा प्रकरणात समूपदेशन करुन कौटुंबिक समस्यांवर तोडगा काढल्या जाते.

भरोसा सेलमध्ये पीडित महिलांप्रमाणे पुरुषांच्याही तक्रारी स्वीकारण्यात येतात. अनेक कुटुंबात पती-पत्नीत वाद असतात. अन्यायग्रस्त महिला किंवा पुरुषांना न्याय मिळवून देण्याचे काम पोलीस करतात. महिलांप्रमाणे पुरुषांच्याही तक्रारींना गांभीर्याने घेतल्या जाते. -सीमा सूर्वे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरोसा सेल. नागपूर पोलीस)