वर्धा: थोर व्यक्तीच्या कार्याने गाव ओळखले जाते. तसेच गाव सोडून इतरत्र नाव कमावले की गावाच्या नावाला उजाळा मिळतो. तसेच आर्वी या गावाबाबत म्हणता येईल. या गावास स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक राष्ट्रीय नेत्यांनी भेटी दिल्यात. तसेच अनेक संतांची ही कर्मभूमी राहली. प्रसिद्ध कामगार नेते दत्तोपंत ठेंगडी यांचे हे जन्मगाव. पण काँग्रेस राजवटीत त्यांचे स्मरण अपवादानेच झाले.
आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानद सचिव सुमित वानखेडे यांनी या गावाचा कायापालट करण्याचा चंग बांधला आहे. त्यास विद्यमान सत्ताधारी पण अनुकूल. म्हणूनच तब्बल १५७ कोटी रुपये एकहाती मंजूर करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याने महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगर उथान योजनेतून आर्वीच्या विविध रस्त्यांसाठी एवढा घसघशीत निधी दिला आहे.
हेही वाचा… बीड जाळपोळीची ‘एसआयटी’ चौकशी ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
या प्रकल्पामुळे आर्वी शहराचा चेहरामोहरा बदलणार. आगामी पन्नास वर्षाचा विचार करून रस्ते, ड्रेनेज व अन्य कामे होणार असल्याचे वानखेडे सांगतात. अशी भरीव मदत केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहे. पांढऱ्या सोन्याची पंढरी व ठेंगडी यांची जन्मभूमी असलेल्या या गावास आजपर्यंत विकासाचा स्पर्श झाला नव्हता.आता कमी पडणार नसल्याची खात्री ते देतात.