लोकसत्ता टीम

अकोला : संपूर्ण जगभरात साजरा केल्या जाणाऱ्या ख्रिसमस अर्थात नाताळ या ख्रिश्चन धर्मियांच्या सणासाठी अकोल्यातील प्रार्थना मंदिरांमध्ये (चर्च) जय्यत तयारी करण्यात आली आहे. सर्व चर्चेससह सुमारे १६० वर्षांचा इतिहास असणारी अकोल्यातील एकमेव ख्रिश्चन कॉलनी ख्रिसमससाठी सजली. सर्वत्र अंतर्गत आणि बाह्य सजावटीसह सुंदर रोषणाई करण्यात आलेली आहे. सांताक्लॉजच्या वेशातील युवक धमाल आणत असून त्यांच्याकडून चॉकलेट आणि इतर बक्षिसे घेण्यासाठी चिमुकल्यांची लगबग सुरू झाली आहे.

जगाच्या बहुतांशी भागांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मदिवसानिमित्त २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस अर्थात नाताळ हा सण साजरा केला जातो. या सणात एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छापत्रे देऊन परस्परांचे अभिनंदन करण्यात येते. या काळात ख्रिश्चन धर्मीय आपापल्या घरांची सजावट आणि रोषणाई करतात. यावेळी ख्रिश्चन धर्मियांच्या धार्मिकस्थळांची म्हणजेच चर्चची देखील सजावट आणि रोषणाई केली जाते. अकोल्यात अलायन्स मिशनचे चार चर्च आहेत. इतर मिशनचेही चर्चेस आहेत. अकोला जिल्ह्यात सुमारे ३० च्या आसपास चर्चेस आहेत. रोमन कॅथलिक, प्रोटेस्टंट असे ख्रिश्चन धर्मियांचे दोन पंथ असून, जिल्ह्यात २० हजाराच्या आसपास ख्रिश्चन बांधव आहेत. ख्रिसमसनिमित्त शहरातील चर्चेसमधून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.ख्रिसमस ट्रीचे नाताळ सणात महत्व आहे. नाताळासाठी सजवलेले हे सूचिपर्णी झाड असते. याच दिवशी रात्री लालभडक पेहराव आणि पांढरी शुभ्र दाढी असणारा सांताक्लॉज आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो.

आणखी वाचा-यवतमाळात आयआयटी, वाशीमला एआयआयएमएस तर पुसदला आयआयएम…

२५ डिसेंबरला सूर्य नेहमीपेक्षा थोडा कमीच वेळ दर्शन देतो. २२ डिसेंबर हा दिवस वर्षातील सर्वात छोटा दिवस असतो. त्यानंतर येणारा २५ डिसेंबरही छोटा दिवस असतो. दिवस छोटा असेल तर अर्थातच रात्र मोठी असते. त्यामुळे २५ डिसेंबरची रात्र ही तुलनेने मोठीच असल्याने ख्रिश्चन धर्मीय मेणबत्त्या पेटवून, नाचून-गाऊन नाताळचा आनंदोत्सव साजरा करतात. त्यापूर्वी २४ डिसेंबरच्या रात्री वॉच नाईट साजरी केली जाते. यावेळी ख्रिश्चन धर्मीय घरोघरी जाऊन येशू ख्रिस्तांच्या जन्माची गाणी म्हणतात. वाद्यवृंदासह सादर केली जाणारी ही गाणी लक्ष वेधून घेतात. डिसेंबर महिना लागताच नाताळाची लगबग सुरु होते. सर्व चर्चेसमधून संडे स्कुल, तरुण संघ, महिला संघ ख्रिस्तजन्माच्या गाण्यांची तयारी सुरु करतात.

अनेक ठिकाणी ख्रिस्तजन्मावर आधारित देखावे आणि नाटिकाही सादर केल्या जातात. या काळात लहान मुले, महिला आणि पुरुषांसाठी विविध खेळ स्पर्धा, एखाद्या प्रेक्षणीय स्थळी सहल असे कार्यक्रम आयोजित केले जातात. ३० डिसेंबरच्या रात्री किंवा १ जानेवारीला प्रार्थना सभेनंतर अनेक चर्चेसमधून कार्यक्रम आयोजित केले जातात. ३१ डिसेंबरच्या रात्रीही पुन्हा वॉच नाईटचे आयोजन केले जाते. कॅरोल पार्टी घरोघरी जाऊन नववर्ष स्वागताची गीते सादर करतात. १ जानेवारी हा नववर्षदिनही ख्रिश्चन धर्मीय एखाद्या सणाप्रमाणेच साजरा करतात. सध्या सर्वत्र नाताळचा उत्साह दिसून येत आहे.