अमरावती : जिल्ह्यात रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय बनला असून अपघातात प्राण गमावणाऱ्यांची गेल्या सहा-सात महिन्यांतील संख्या भयावह आहे. गेल्या सहा महिन्यांत १४६ प्राणांतिक अपघात होऊन त्यांत १६६ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात अलीकडच्या काळात राष्ट्रीय, राज्य महामार्गाचे जाळे मोठ्या प्रमाणात निर्माण झाले. त्यामुळे वाहनांचा वेगही वाढला आहे. अनेकदा दुचाकी वाहनचालक वाहतूक नियम न पाळता वाहने चालवितात. त्यातून अपघातांची संख्या वाढली आहे.
जानेवारी ते जून या सहा महिन्यांत ग्रामीण भागात एकूण २८५ अपघात झाले आहेत. त्यात १४६ प्राणांतिक, ७१ गंभीर तर ५६ किरकोळ अपघातांचा समावेश आहे. ७१ गंभीर अपघातांमध्ये १३४ जणांनी हात, पाय व अन्य अवयव कायमचे गमावले. किरकोळ अपघातांमध्ये ११४ जण जखमी झाले.
या एकूण अपघातांपैकी ६६ अपघात हे राष्ट्रीय महामार्गावर, १३१ अपघात हे राज्य महामार्गांवर तर ८८ अपघात अन्य मार्गांवर झाले आहेत. सर्वाधिक अपघात राज्य महामार्गांवर झाल्याने नव्याने अपघातप्रवण स्थळे निश्चित केली जात आहेत.
अपघात रोखण्यासाठी जिल्ह्यातील १३९ अपघात प्रवणस्थळी आवश्यक उपाययोजना गरजेच्या आहेत. काही ठिकाणी तांत्रिक दोष, काही ठिकाणी सूचना फलकांचा अभाव, गतिरोधकांची गरज आहे. अपघात कमी होण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना, जनजागृती होत असली तरी अपघातांची संख्या कमी व्हायला तयार नाही.
दरवर्षी राज्य शासनातर्फे रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाते. या अभियानावर लाखो रुपये खर्च होतात. अपघात कमी होऊन लोकांचे जीव वाचावे हाच त्यामागचा उद्देश आहे. एका सर्वेक्षणात चालकाच्या चुकीमुळेच जास्त अपघात झालेले आहेत. वाहनांची संख्या वाढली. त्यामुळे अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी वाहन चालकांनी नियम पाळणे महत्त्वाचे आहेच. शिवाय अनेक अपघात स्थळावर तांत्रिक दोष किंवा सूचना फलक, दिशादर्शक, गतिरोधक नसल्याचेही चित्र आहे.
हेही वाचा – पावसात भटकंती अन् भरपेट मेजवानी; सात जीव घेणाऱ्या वाघाला जेरबंद करण्याचे आदेश
दंडात्मक कारवाई, तरीही हेल्मेट, सीटबेल्टचा वापर नाहीच
दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरावे, यासाठी वाहतूक शाखेकडून जनजागृतीसह दंडात्मक कारवाईदेखील करण्यात येते. मात्र, तरीही त्याकडे कानाडोळा केला जातो. अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. सिटबेल्टचा वापर केल्यास जीव वाचू शकतात, मात्र चारचाकी वाहनधारक राष्ट्रीय महामार्गावरही सिटबेल्ट वापरत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
जूनमध्ये ३० ठार
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जून २०२४ मध्ये एकूण ५२ अपघात झाले. त्यात २५ प्राणांतिक अपघातात ३० जणांना प्राण गमवावे लागले. त्यात २९ पुरुष आणि एका महिलेचा समावेश होता. १४ गंभीर अपघातांमध्ये ३२ जणांना कायमचे अपंगत्व आले आहे.