भंडारा : राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी लाभार्थी म्हणून पात्र ठरविण्यात आलेल्या भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या प्रस्तावांची ७ मार्चपूर्वीच फेरतपासणी पूर्ण झालेली आहे. या तपासणीत जिल्ह्यातील १७ हजार १८३ लाडक्या बहिणींना वेगवेगळ्या कारणांमुळे मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. सत्तेत बसलेल्या भावाने निवडणूक जिंकण्यासाठी आपली फसवणूक केल्याची भावना व्यक्त होत आहे.

योजनसाठी अपात्र झालेल्यांकडून यापूर्वी दिलेली अनुदानाची रक्कम मात्र परत घेतली जाणार नाही. मात्र, त्यांचे अनुदान थांबविण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यात मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेसाठी नारीशक्ती अॅपच्या माध्यमातून सुमारे २ लाख ९९ हजार ८७१ महिलांनी प्रस्तावाची नोंदणी केली होती. यापैकी २ लाख ८२ हजार ७८८ महिला ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी पात्र ठरविण्यात आल्या. विधानसभा निवडणुका आटोपून नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर या सर्व प्रस्तावांची जिल्ह्यातील सातही तालुकास्तरीय समितीकडून फेरतपासणी सुरू करण्यात आली होती.

८ मार्चला १ हजार ५०० रुपयांचे वितरणनिकषात न बसणाऱ्यांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आल्यानंतर राज्य शासनाकडून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रतिमाह १५०० रुपयांचे वितरण करण्यात आले. अपात्र ठरलेल्या १७ हजार १८३ लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहिल्याची माहिती आहे.

निवडणुकांपूर्वी पात्र, आता केले अपात्र …

विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहिण योजना अंमलात आणली गेली. वारेमाप प्रचार व प्रसार करून महिलांची मते मिळविण्यात आली. मात्र, सत्ता मिळताच चारचाकी वाहन, नोकरीवर असलेले, आयकर भरणारे व दुसऱ्या राज्यात गेलेल्यांचे अर्ज अपात्र करण्याचे निर्देश देण्यात आले.

१४ महिलांनी स्वतःहून लाभ सोडला…

जिल्ह्यात आतापर्यंत १४ महिलांनी मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता. आता मात्र या महिलांनी स्वतःहून माघार घेत योजनेचा लाभ नाकारला असल्याचे लेखी पत्र संबंधित तालुक्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे सादर केले.

१००% अर्जाची तालुकास्तरीय समितीकडून पडताळणी…

तालुकास्तरीय समितींच्या तपासणीत १७ हजार १८३ लाभार्थ्यांचे प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले आहे. तर २.८२ लाख अर्ज मंजूर झाले.

तालुका निहाय लाभार्थी

तालुका पात्र अपात्र
भंडारा ६१,४९७ ३,१३३
लाखनी२९,१५० २,२६२
लाखांदूर ३१,७९७ २,१७६
मोहाडी ३२,७४२ १,८७०
पवनी ३६,३२२ २,७९९
साकोली ३४,३३० २,३७९
तुमसर ५५,९५०२,५६४
एकूण२,८२,७८८ १७,१८३