लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : उपराजधानीतील महत्त्वपूर्ण वैद्यकीय संस्था असलेल्या मेडिकलमध्ये गेल्या ७५ वर्षांत हजारो विद्यार्थी घडले. त्यापैकी १७ माजी विद्यार्थ्यांना पद्मश्री-पद्मभूषण तर तिघांना मॅससेसे पुरस्कार मिळाला आहे. या संस्थेच्या १ डिसेंबरला आयोजित अमृत महोत्सवी कार्यक्रमाला खुद्द राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी मेडिकलमध्ये विविध कामांना गती दिली गेली आहे.

मेडिकल या संस्थेची स्थापना १९४७ मध्ये देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झाली. तर मेडिकलशी संलग्नित सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन माजी राष्ट्रपती डॉ. शंकरदयाल शर्मा यांच्या हस्ते झाले. मेडिकल महाविद्यालयातून आजपर्यंत सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले असून ते देश-विदेशातील खासगी व सरकारी अशा महत्त्वाच्या संस्थांमध्ये कार्यरत आहेत.

आणखी वाचा-राज्यात २१ लाख रुग्णांवर जनआरोग्य योजनेतून उपचार

मेडिकलमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांपैकी १७ जणांना पद्मश्री-पद्मभूषण, १८ जण आयएएस-आयपीएस, ७ जणांना डॉ. बी.सी. रॉय पुरस्कार, २ जणांना मॅगेसेसे पुरस्कार, ८ जण आमदार- खासदार- मंत्री, ५५ जण भारतीय सशस्त्र दलातील उच्च पदांवर गेले. मेडिकल रुग्णालयाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याने या संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त १ डिसेंबरला दुपारी ४ ते ५ वाजता दरम्यान राष्ट्रपतींच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार असून त्यामध्ये मेडिकलमधून वैद्यकीय शिक्षण घेतलेले देश- विदेशातील दोन हजारावर विद्यार्थी सहभागी होण्याची शक्यता आहे. या सगळ्यांनी कार्यक्रमासाठी नोंदणी केल्याचा मेडिकल प्रशासनाचा दावा आहे. अमृत महोत्सवी कार्यक्रमाला राष्ट्रपतींसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि इतरही मंत्री उपस्थित राहणार आहेत. मेडिकलमधील १९४७ मध्ये सुरू झालेल्या पहिल्या तुकड्यातील नागपुरातील ज्येष्ठ फिजिशियन डॉ. बी. जे. सुभेदार यांचा गौरव राष्ट्रपतींच्या हस्ते केला जाणार आहे.

आणखी वाचा-ओबीसी महासंघाचा न्या.शिंदे समितीवरच आक्षेप; बरखास्तीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नावाजलेले चेहरे

मेडिकलमधून पदवी अथवा पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेतलेल्यांमध्ये डॉ. प्रकाश आमटे, डॉ. साधना आमटे, डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग, डॉ. श्रीकांत जिचकार, डॉ. विकास महात्मे, डॉ. अनिल बोंडे, डॉ. संजय मुखर्जी, डॉ. स्वाती कुलकर्णी, डॉ. अमित तेलंग आणि इतरही अनेक नावाजलेल्या व्यक्ती आहेत.

५१४ कोटींची विकास कामे

मेडिकलमध्ये ५१४ कोटींच्या निधीतून अद्ययावत कॅन्सर रुग्णालय, मुलींसाठी वसतिगृह, सुरक्षा भिंत, ट्रामा केअर सेंटर व रुग्णालयाला जोडणारा स्काय वॉक, पेईंग वार्ड आणि इतरही विविध विकासात्मक कामे होणार आहेत. सोबत मेडिकलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून लवकरच ५५० चतुर्थश्रेणींची पदे भरली जाणार आहेत. दरम्यान, राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मेडिकलमध्ये रंगरंगोटी, रस्ता दुरुस्तीसह इतरही कोट्यवधींच्या कामाला प्रशासनाकडून गती देण्यात आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 17 former medical students awarded padma shri padma bhushan and magsaysay award to three mnb 82 mrj
Show comments