वर्धा : भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीवर जिल्ह्यातून १७ नेत्यांची वर्णी लागली असून राजेश बकाने यांची गच्छंती झाली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली. चिटणीस म्हणून वर्धा जिल्हा परिषदेच्या मावळत्या अध्यक्ष सरीता विजय गाखरे यांना संधी देण्यात आली आहे.
जिल्ह्यातून प्रथमच प्रदेश कार्यकारिणीवर महिला नेत्यास संधी मिळाली आहे. विदर्भातून घेण्यात आलेल्या तीन चिटणीसपैंकी त्या एक आहे. तसेच विशेष निमंत्रित म्हणून माजी खासदार सुरेश वाघमारे, सुधीर दिवे, किरण उरकांदे व भुपेंद्र शहाणे यांना घेण्यात आले असून कार्यकारिणी सदस्य म्हणून अतुल तराळे यांना संधी मिळाली. सुधीर दिवे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विश्वासू समजल्या जात असून ते नागपूर मुक्कामी असले तरी वर्धा जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून त्यांची वर्णी लागली आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राहिलेले किरण उरकांदे यांनी दोन वर्षांपूर्वीच भाजपाप्रवेश केला.
भुपेंद्र शहाणे हे जिल्हा भाजपाचे कोषाध्यक्ष असून संघ वर्तुळाचे विश्वासू आहे. तर अतुल तराळे हे वर्धा नगर परिषदेचे मावळते अध्यक्ष राहिले. प्रदेश सचिव म्हणून कार्यरत देवळीचे राजेश बकाणे यांचा पत्ता साफ करण्यात पक्षीय विरोधकांना यश आले आहे. निमंत्रित सदस्य म्हणून वर्धा जिल्ह्यातून संजय गाते, अर्चना वानखेडे, नितीन मडावी, जगदीश टावरी, अशोक विजयकर, आशिष ताकसांडे, अतुल गोळे, माया उमाटे, अंकूश ठाकुर, वरूण पाठक, राजीव बत्रा यांचाही समावेश करण्यात आला आहे.