नागपूर : नागपूरसह राज्यभरात नायलाॅन मांजाला प्रतिबंध आहे. हा मांजा विक्री करणाऱ्यांसह बाळगणाऱ्यांवर नागपूर पोलीस व महापालिकेकडून वेळोवेळी कारवाईही होते. त्यानंतरही मकरसंक्रांतीला नागपुरात बऱ्याच बेजवाबदार नागरिकांनी या मांजाने पतंग उवडल्या. बेजवाबदारपणे पतंग उडवणाऱ्यांमुळे मंगळवारी मेडिकल, मेयो या दोन्ही शासकीय रुग्णालयांत तब्बल १७ रुग्णांना दाखल होण्याची पाळी आली.

नागपुरातील मेडिकल रुग्णालयात सर्वाधिक १० तर मेयो रुग्णालयात ७ रुग्ण दुपारी ५ वाजेपर्यंत मांजामुळे जखमी होऊन उपचारासाठी दाखल झाले. तर शहरातील खासगी रुग्णालयातही अनेक रुग्ण मांजामुळे कान, नाक, बोट, हाताला काही प्रमाणात कापल्या जाऊन उपचाराला आल्याची माहिती डॉक्टरांकडून दिली गेली. नागपुरातील जखमींची संख्या बघता या मांजावर नागपुरात रोक लावण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे दिसत आहे.

हेही वाचा…नायलॉन मांजाचा फास, अकोल्यात गळा चिरून दुचाकी चालकाचा मृत्यू

मेडिकल रुग्णालयात पतंग व मांजाशी संबंधित उपक्रमामुळे जखमी होऊन उपचाराला दाखल झालेल्या रुग्णांमध्ये १० वर्षीय बालकांपासून ७५ वर्षीय वृद्धांचा समावेश आहे. त्यापैकी जास्तच गंभीर इजा असलेल्या रुग्णाला विविध वार्डात दाखल केले गेले. तर काहींना प्राथमिक उपचार करून सुट्टी दिली गेली. येथे १० वर्षीय ३ मुले उपचाराला आली.

तिघेही वेगवेगळ्या वेळेवर उपचाराला आलेल्या मुलांच्या बोटाला मांजामुळे मोठा चिरा लागला होता. रक्त प्रवाह थांबत नसल्याने ते उपचाराला आले. त्यांना डॉक्टरांनी टाके लावून रक्त प्रवाह थांबवला. त्यानंतर काही तासानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली गेली. तर एक २७ वर्षीय व्यक्ती पतंग पकडण्यासाठी रस्त्यावर पळत असतांना अपघात होऊन उपचाराला आला. तर मेयो रुग्णालयात १७ वर्षे ते ८५ वर्षापर्यंतचे रुग्ण पतंग व मांजाशी संबंधित उपक्रमामुळे जखमी होऊन उपचारासाठी आले.

त्यापैकी काहींचा मांजामुळे हात, नाक, कान, गळ्याला इजा झाली होती. तर काही जणांचा मांजामुळे अपघात होऊन जखमी झाल्याची माहिती आहे. तर खासगी रुग्णालयातही मोठ्या संख्येने रुग्ण उपचाराला आल्याची माहिती आहे. परंतु या रुग्णांची महापालिका वा शासकीय स्तरावर स्वतंत्र नोंद नसल्याने ही आकडेवारी पुढे आली नाही.

हेही वाचा…वाघ समोर उभा ठाकला, पण शेतकऱ्याने असे काही केले की पळून गेला; गडचिरोलीतील…

मेडिकल, मेयो रुग्णालयात अतिरिक्त डॉक्टरांची सेवा

नागपुरातील मेडिकल, मेयो या दोन्ही शासकीय रुग्णालयात मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग व मांजामुळे जखमी रुग्णांची संख्या वाढते. त्यामुळे मंगळवारी दोन्ही रुग्णालयात शल्यक्रियाशास्त्र, अस्थिरोग विभागासह इतरही विभागाचे डॉक्टर तैनात करण्यात आले होते. या सगळ्यांनी रुग्ण येताच तातडीने उपचार केले. या रुग्णांसाठी प्रशासनाकडून औषधांसह सर्जिकल साहित्यांचीही उपलब्धता करण्यात आली होती.

Story img Loader