लोकसत्ता टीम

वर्धा : एखाद्या संस्थेची कामाची पद्धत त्या संस्थेस विश्वसनियता मिळवून देण्यास पूरक ठरते. असा विश्वास निर्माण झाला की लोकं डोळेझाकपणे त्या संस्थेकडे वळतात. आता कृषी उत्पन्न बाजार समित्या म्हटल्या की गोंधळच डोळ्यापुढे येतो. मात्र त्यास हिंगणघाट बाजार समिती अपवाद ठरावी. शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम नाममात्र शुल्कात उपलब्ध करून देणारी ही एकमेव बाजार समिती असावी, अशी जाहीर प्रशस्ती उपमुख्यमंत्री अजित पवार हे देऊन चुकले आहे. कारण शेतकरी वर्गास दिलासा देणारे संचालक व कर्मचाऱ्यांचे वर्तन. आज त्याच विश्वासातून या बाजार समितीने खरेदी विक्रम स्थापित केला आहे.

बाजार समितीत १० मार्च या एकाच दिवशी १६ हजार ९५८ क्विंटल कापूस खरेदीची नोंद झाली आहे. ११ नोव्हेंबर २०२४ रोजी खरेदीस आरंभ झाल्यानंतर या चार महिन्याच्या कालावधीत एकूण ९ लाख ४४ हजार ६७२ क्विंटल कापूस खरेदी झाली असून हा एक विक्रम ठरला आहे. यात यात खाजगी व्यापाऱ्यांनी ७ लाखावर तर सीसीआयकडून १ लाख ६६ हजार क्विंटल खरेदी झाली. बाजार समितीचा विस्तीर्ण परिसर कापसाने तुडुंब भरला. राज्यभरात या बाजार समितीचा अव्वल क्रमांक असतो, अशी माहिती अध्यक्ष सुधीर कोठारी देतात. खुल्या बाजारात कापूस ६ ते ७ हजार २०० तर सीसीआयचे दर ७ हजार ४०० ते ७०० दरम्यान राहले. कापूस विक्रीची ऑनलाईन नोंदणी १५ मार्चपर्यंत आहे. ती मुदत वाढविणे आवश्यक असल्याचे मत कोठारी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

या यशाचे गमक काय, तर बाजार समितीच्या आवारात १७ जिनिंग प्रेसिंग युनिट खरेदीस येतात. त्यांच्याकडून खुल्या लिलाव पद्धतीने कापूस खरेदी होते. शेतकऱ्यांना या स्पर्धेतून चांगला दर मिळतो. चार पैसे अधिकचे मिळत असल्याने बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातीलच नव्हे तर अन्य वर्धेशिवाय अन्य जिल्ह्यातून देखील शेतकरी ईथे आपला कापूस विकण्यास आणतात. सीसीआयची पण ईथे खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांना दोन्ही पर्याय एकाच जागी उपलब्ध असतात. यामुळे शेतकरी ईथे प्रथम पसंती देत असल्याचे संचालक उपाध्यक्ष हरीश वडतकर संचालक मधुकर डांभारे, मधुसूदन हरणे, ओमप्रकाश डालिया, प्रफुल्ल बाडे नमूद करतात.

याखेरीज उपलब्ध सुविधा शेतकऱ्यांना खेचून आणतात, असे संचालक डॉ. निर्मेश कोठारी नमूद करतात. अल्प दरात शेतकऱ्यांना भोजन उपलब्ध आहे. शीतगृहाची व्यवस्था करण्यात आली. शेतकरी पाल्यांना मोफत संगणक गुणवत्तेवर देण्यात येतात. हिंगणघाट शहराच्या आर्थिक विकासात या बाजार समितीचे योगदान पाहून राज्यातील विविध बाजार समित्यांचे संचालक मंडळ इथली व्यवस्था व कामकाज पद्धत पाहण्यास भेटी देत असल्याचे सांगण्यात आले. संचालक उत्तम भोयर, राजेश मंगेकर, पंकज कोचर, घनश्याम येर्लेकर, संजय कात्रे, शुभ्रबुद्ध कांबळे, हर्षद महाजन, ज्ञानेश्वर लोणारे, माधुरी माधव चंदनखेडे, नंदा चांभारे व सचिव टी. सी. चांभारे उपस्थित होते.