लोकसत्ता टीम

बुलढाणा : दारूच्या नशेत वडिलांनी आईला अमानुष मारहाण केली. त्यामुळे चिडलेल्या मुलाने वडिलांची दगडाने ठेचून हत्या केल्याची खळबळजनक घटना चिखली तालुक्यातील धोत्रा नंदई येथे घडली.

आरोपी मुलगा अल्पवयीन (१७ वर्षीय) आहे. सुरेश रमेश भांडवले असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मुलाने त्याच्या ४३ वर्षीय वडिलांना दगडाने ठेचून ठार केले आहे. घटनेचा विस्तृत तपशील मिळाला नाही. प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, सुरेश भांडवले हे व्यसनी होते. ते नेहमी दारू पिऊन घरी येत असत आणि त्यांची पत्नी छाया यांना मारहाण करत असत. २१ मार्च रोजी दुपारीही त्यांनी दारू पिऊन घरी आल्यानंतर पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली.

यावेळी त्यांच्या १७ वर्षीय मुलाचा राग अनावर झाला. रागाच्या भरात त्याने वडिलांच्या डोक्यात दगड घालून त्यांना ठार मारले. सैलानी यात्रेनिमित्त तो पिंपळगाव सैलानी येथे कामाला गेला होता. दोन दिवसांपासून वडील आईला मारहाण करत असल्याची माहिती मिळताच तो आज शुक्रवारी, २१ मार्चला घरी आला. आल्यावर त्याने वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, वडील ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी पुन्हा पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहून मुलाचा राग अनावर झाला आणि त्याने वडिलांवर हल्ला केला.

घटनेची माहिती मिळताच अमडापूर ( तालुका चिखली ) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले. घटना स्थळाचा पंचनामा करण्यात आला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन चिखली येथील सामान्य रुग्णालयात करण्यात आले. दारूच्या व्यसनाचे परिणाम किती गंभीर होऊ शकतात हे दर्शविणाऱ्या या भीषण घटनेने चिखली तालुका हादरला आहे.