महेश बोकडे
नागपूर : एसटीच्या ताफ्यात ५ हजार १५० इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करण्याची घोषणा शासनाने अर्थसंकल्पात केली होती. त्यानुसार, एसटीकडून बसेस भाडेतत्त्वावर घेण्याची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यापूर्वी राज्यात या बसेससाठी १७५ डेपो वा आगारात चार्जिंग केंद्र उभारण्याचे काम हाती घेण्यात येत आहे.‘एसटी’कडून भाडेतत्त्वावर घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक बसेसला चार्ज करण्यासाठी डेपो वा आगारात उच्चदाबाची वीज जोडणी लागणार आहे. त्यामुळे महामंडळाकडून राज्यभरातील सगळ्या विभाग नियंत्रकांना असे केंद्र उभारण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यात उच्चदाबाच्या वीज जोडणीसाठी विभागातील कनिष्ठ अभियंत्यांना (इलेक्ट्रिकल) आश्यक सूचना करायच्या आहेत.
इलेक्ट्रिक बसेसचे परिचालन जास्त अपेक्षित असलेल्या भागातील चार्जिंग केंद्रावर जास्त चार्जिंग पाॅईंट तर कमी परिचालनाच्या ठिकाणी कमी चार्जिंग पाॅईंट अपेक्षित आहेत. चार्जिंग करताना अनुचित प्रकार घडू नये अशा जागा निवडून तेथे सुरक्षेची आवश्यक काळजीही घ्यायची आहे. विदर्भातील नागपूर विभागात सुमारे ३५ आणि अमरावती विभागात सुमारे १५ असे एकूण पन्नासच्या जवळपास चार्जिंग केंद्र असणार आहेत. हे केंद्र गरजेनुसार कमी-जास्त केले जातील. चार्जिंग केंद्र होणार असल्याने आता लवकरच राज्यात इलेक्ट्रिक बस धावण्याचे संकेत मिळत आहेत.
हेही वाचा >>>आमदार नितीन देशमुखांची संघर्ष यात्रा पोलिसांनी अडवली; ताब्यात घेताच म्हणाले, “मी मरेन पण जामीन घेणार नाही”!
“एसटी महामंडळाकडून इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्वावर घेण्याची निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या बसेसला चार्ज करण्यासाठी राज्यातील १७५ डेपो वा आगार परिसरात चार्जिंग केंद्र उभारण्यात येणार आहेत.”- शिवाजी जगताप, महाव्यवस्थापक (वाहतूक), एसटी महामंडळ, मुंबई.