शेअर बाजारात गुंतवणूक करायला लावल्यानंतर म्युचअल फंडचे बनावट दस्तऐवज तयार करून ७९ नागरिकांची तब्बल १८ कोटी ५६ लाख ७३ हजार ६३४ रुपयांनी फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी ऋषभ राजेश सिकची (२७) रा. बियाणी चौक यांच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ऋषभ सिकची यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्यासह इतर ७८ नागरिकांनी अनुग्रह स्टॉक ॲण्ड ब्रोकर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक परेश कारिया याच्यावर विश्वास ठेऊन शेअर बाजारात गुंतवणूक केली. परंतु, परेश कारिया याच्यासह अन्य आरोपींनी संगमनत करून ७८ नागरिकांचे शेअर म्युचअल फंडचे बनावट कागदपत्रे ( बनावट कॉन्ट्रॅक्ट नोट, लेझर स्टेटमेंट व मार्जिंग स्टेटमेंट) तयार केली व संकेतस्थळावर अपलोड केले. त्याव्दारे ७८ गुंतवणुदारांची १८ कोटी ५६ लाख ७३ हजार ६३६ रुपयांनी फसवणूक करण्यात आली.

यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली.त्यानंतर पोलिसांनी अनुग्रह स्टॉक ॲण्ड ब्रोकर प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक परेश मुलजी कारीया, तेजीमंदी डॉटकॉमचा संचालक अनिल गांधी, एडलवेस कस्टोडियल सर्व्हिसेस, एनएसईचे एमडी विक्रम लिमये, एनएसईचे चिफ रेग्युलेटरी ऑफिसर आणि सीडीएसएल संस्था यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Story img Loader