नागपूर : राज्यात २०१२-१३ मध्ये सुरू झालेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती प्रत्येक वर्षी वाढत असून त्याचा हजारो रुग्णांना लाभही मिळत आहे. मात्र, या योजनेतून मागणी नसलेले १८१ आजार वगळण्यात येणार असून शासनाने त्याबाबत प्रक्रिया सुरू केली आहे.
या योजनेत आधी ९९६ व्याधींवरील उपचारांचा समावेश होता. कालांतराने त्यात २१३ नव्या व्याधींवरील उपचारांची भर टाकली गेली. परंतु, एकूण १ हजार २०९ व्याधींपैकी १८१ व्याधींवरील उपचाराला रुग्णांकडून राज्यात मागणी नव्हती. त्यामुळे शासनाकडून या १८१ व्याधींवरील उपचार वगळण्याचा प्रस्ताव संबंधितांना दिला असून त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – शरद पवारांवर आरोप करणाऱ्या नामदेवराव जाधवांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक, पोलिसांत तक्रार
हेही वाचा – २८३ शिक्षकांच्या आयुष्यात यावर्षी दिवाळी लखलखली
या योजनेतून २०१६-१७ मध्ये ४.३२ लाख रुग्णांवर, २०२०-२१ मध्ये ६.७१ लाख रुग्णांवर, २०२१-२२ मध्ये ८.४९ लाख रुग्णांवर तर २०२२-२३ मध्ये ७.९७ लाख रुग्णांवर उपचार झाले. प्रत्येक वर्षी या योजनेतून उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. परंतु, पोर्टाकॅव्हल ऍनास्टोमोसिस, एक्सिजन आर्थ्रोप्लास्टी, सॅक्रल रिॲक्शन, फेकल फिस्टुला क्लोझर आणि इतर असे एकूण १८१ पद्धतीच्या आजार व व्याधींवरील उपचाराला रुग्णांकडून मागणी नव्हती. त्यामुळे हे आजार योजनेतून वगळण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे. या विषयावर महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे सहाय्यक संचालक रवी शेट्ये यांना विचारणा केली असता त्यांनी हे आजार वगळले जाणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.