यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात उद्या, २६ एप्रिल रोजी मतदान प्रकिया पार पडत आहे. लोकशाहीच्या या उत्सवासाठी प्रशासन सज्ज झाले असून १९ लाख ४० हजार ९१६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. दोन हजार २२५ मतदान केंद्रावर ही प्रकिया पार पडणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज गुरूवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील यवतमाळ, राळेगाव, दिग्रस, पुसद, कारंजा आणि वाशिम या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात १० लाख दोन हजार ४०० पुरूष मतदार, नऊ लाख ३८ हजार ४५२ महिला मतदार तर इतर ६४ असे एकूण १९ लाख ४० हजार ९१६ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मतदारसंघात ८५ वर्षावरील २२ हजार ८३० मतदार असून, १३ हजार ६६८ दिव्यांग मतदार आहेत. दोन हजार २२५ केंद्रावर मतदान होणार असून यासाठी नऊ हजार ९७२ मतदान केंद्राध्यक्ष, सात हजार ३४१ मतदान कर्मचारी, २११ क्षेत्रिय अधिकारी आणि १३१ सुक्ष्म निरीक्षक कर्तव्य बजावत आहेत. हे सर्व कर्मचारी आज गुरूवारी आपल्या मतदान केंद्रांवर रवाना झाले असून त्यासाठी ५३३ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा…अकोल्यात उमेदवारांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; छुप्या प्रचारावर जोर

जिल्ह्यात दिव्यांग, महिला, युवा आणि आदर्श असे २४ मतदान केंद्र आहेत. शुक्रवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून, एक हजार ११४ मतदान केंद्रावरून मतदानाचे थेट प्रेक्षेपण पाहता येणार आहे. ही मतदान केंद्र जिल्हा मुख्यालय तसेच निवडणूक आयोगाशी जोडण्यात आली आहे. आजंती (दिग्रस) व बालेवाडी (पुसद) हे दोन मतदारसंघ संवेदनशील असून या ठिकाणी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मतदान केंद्र आणि मतदान प्रक्रियेची सुरक्षा व्यवस्था चार हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सांभाळत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी दिली.

हेही वाचा…“शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘शपथनामा’ ही जनतेची फसवणूक,” भाजप प्रदेशाध्यक्षांची टीका, म्हणाले…

मतदार हेल्पलाईन व टोल फ्री क्रमांकार आतापर्यंत ६३ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यांचे निरसन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी सांगितले. सी-व्हिजिल ॲपवर ६१ तक्रारी प्राप्त झाल्या, त्याही निकाली काढण्यात आल्या, असे जिल्हाधिकारी म्हणाले. आचारसंहिता उल्लंघनाच्या तीन तक्रारी प्राप्त झाल्या. त्यावर संबंधितांना नोटीस बजावण्यात येवून चौकशी सुरू आहे. या काळात जिल्ह्यात २२ लाख रूपयांची अवैध रोकड जप्त करण्यात आली, तर मद्य, अंमली पदार्थांसंदर्भात कारवाई करून ७१ लाख ३० हजार रूपयांचा मुद्देमला जप्त करण्यात आला, असे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 19 lakh voters in yavatmal washim constituency preparedness at polling stations nrp 78 psg