लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटीच्या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, अर्ज करूनही नागपूर विभागातील ३२,५७३ विद्यार्थ्यांनी शिष्यवृतीचे अर्ज अद्याप सादर केलेले नसून १९,७९६ विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांनी प्रलंबित ठेवल्याचे निदर्शनास आले आहे, अशी माहिती समाजकल्याण विभागाकडून देण्यात आली आहे.

प्रलंबित अर्जाबाबत विभागाने सर्व संबंधितांना सूचित करूनही त्याची दखल न घेतल्याने आता अशा महाविद्यालयांवर कारवाईचा इशारा विभागाने दिला आहे. ज्या महाविद्यालयाकडे मोठ्या प्रमाणावर अर्ज प्रलंबित आहेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करण्याची पुन्हा संधी दिली आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाकडुन संयुक्तपणे भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृती प्रदान केली जाते. सदर महाडीबीटी संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज भरण्यासाठी अनु.जाती प्रवर्गासाठी वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आहे.

आणखी वाचा-पालकांसाठी महत्वाचे! आरटीईअंतर्गत प्रवेश पाहिजे तर मग बदल जाणून घ्या…

सन २०२३-२४ मध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध संर्वगाचे १२ फेब्रुवारी २०२४ अखेर ५२,६२२ अर्जांची ऑनलाईन नोदणी झाली. त्यापैकी विभागाने २७,६२० अर्ज मंजूर केले आहेत. १९,७९६ इतके अर्ज महाविद्यालयाकडेच प्रलंबित असल्याने त्यावर समाज कल्याण विभागास कार्यवाही करता आली नाही. त्यात अनुक्रमे नागपूर १०,२८६ अर्ज, वर्धा २,३७२, भंडारा २,२७३, गोंदिया १,३२०, चंद्रपूर २,९१७ तर गडचिरोली ६२८ अर्जांचा समावेश आहे. २०२३-२४ या वर्षात महाविद्यालयामंध्ये प्रवेश घेतलेले व शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज तत्काळ ऑनलाईन सादर करावेत, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालयांवर जबाबदारी निश्चित करण्यात येऊन कार्यवाही करण्यासाठी शासनाकडे प्रस्तावित करणार. यासंदर्भात कठोर पावले उचलले जातील. -डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 19 thousands of scholarship applications are pending in colleges cwb 76 mrj