वाशीम : पुणे येथील स्वारगेट बसस्थानकावर बंद बसमध्ये तरुणीवर अत्याचाराची घटना ताजी असतानाच वाशीम जिल्ह्यातून देखील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.सात वर्षीय चिमुकली आईस्क्रीम आणण्यासाठी दुकानात गेली. दुकानातील १९ वर्षीय तरुणाची वाईट नजर त्या चिमुकलीवर पडली. त्यामुळे सात वर्षीय चिमुकलीवर १९ वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना वाशीम शहरात घडली आहे.पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून वाशीम शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

राज्यात मुली, तरुणी व महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. पुणे येथील स्वारगेट बसस्थानकावरील तरुणीच्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. त्यातच आता वाशीम जिल्ह्यातून सुद्धा चिमुकलीवर अत्याचार झाल्याचे घृणास्पद घटना समोर आली.विकृत मानसिकतेच्या तरुणाने सात वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याने समाजात संतापाची तीव्र भावना निर्माण झाली आहे. वाशीम शहर पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. पीडित चिमुकली २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ६:३० वाजताच्या सुमारास घरा जवळील एका दुकानात आईस्क्रिम आणण्यासाठी गेली होती.

दुकानात आलेल्या त्या चिमुकलीवर तरूणाची वाईट नजर होती. तरुणाने चिमुकलीला दुकानाच्या आत घेऊन अत्याचार केला. दरम्यान, बराच वेळ होऊनही चिमुकली घरी परत न आल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. चिमुकलीच्या आईने वडिलांना दुकानात जाऊन पाहण्यास सांगितले. चिमुकलीचे वडील दुकानात गेल्यावर तरुणाने मुलगी दुकानात आली नसल्याचे सांगितले. मात्र, पीडितेच्या वडिलांना संशय आल्याने त्यांनी दुकानात वाकून पाहिले, तर त्यांना मुलगी त्या ठिकाणी असल्याचे दिसून आले. आरोपी संशयास्पद अवस्थेत असल्याने वडिलांना मोठा धक्का बसला. पीडितेच्या वडिलांनी तिच्या आईला बोलावून संबंधित प्रकार दाखवला.

चिमुकलीच्या आई व वडिलांनी तातडीने ११२ वर संपर्क करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांचे मदत पथक घटनास्थळी दाखल झाले. आरोपीला ताब्यात घेऊन शहर पोलिसांकडे सुपूर्द केले. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी नराधम आरोपी विरोधात बीएनएस ६५ (२) व लैंगीक अपराधापासून बालकांचे संरक्षण सहकलम ४ अंतर्गत गुन्हा दाखल केला.या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले असून नराधम आरोपी विरोधात रोष व्यक्त केला जात आहे.

Story img Loader