बुलढाणा : अखंड हरीनाम सप्ताहात भगरीचा प्रसाद खाल्ल्याने १९२ भाविकांना विषबाधा झाली. या भाविकांना मंगळवारी रात्री उशिरा नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे जागा अपुरी असल्याने जमिनीवर ताडपत्री टाकून व झाडांना दोरी बांधून त्यावर सलाईन लटकवून रुग्णांना देण्यात आले. यामुळे शासकीय यंत्रणांची रात्री उशिरा तारांबळ उडाली.
लोणार तालुक्यातील खापरखेड व सोमठाणा या गावांच्या मधोमध असलेल्या भगवान काळू नाडे यांच्या शेतात विठ्ठल रुखमाई यांचे मंदिर आहे. त्या ठिकाणी १४ फेब्रुवारीपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता. २० फेब्रुवारीला ७ व्या दिवशी एकादशी आल्याने भाविकांसाठी भगरीचा प्रसाद तयार करण्यात आला. दरम्यान, प्रसाद खाल्ल्यानंतर दोन्ही गावातील भाविक रात्री उशिरा घरी परतले. मात्र काही वेळाने गावकऱ्यांना अचानक मळमळ, उलटी, चक्कर, संडास अशी लक्षणे सुरू झाली. रुग्णांना बिबी (ता. लोणार) येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच गेली. त्यातच वैद्यकीय अधीक्षक रुग्णालयात हजर नसल्याने मदतीसाठी खासगी डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. रुग्णांची संख्या अधिक असल्याने व जागा अपुरी पडल्याने दवाखान्याच्या प्रांगणात ताडपत्री टाकून व झाडाला दोरी बांधून रुग्णांना सलाईन देण्यात आले. काही रुग्णांना लोणार येथील शासकीय रुग्णालयात तर काहींना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.