गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळ प्राधिकरणावर बिरसी ग्रामपंचायतचे तब्बल २.७ कोटी रुपयांचा कर थकीत आहे. कराची रक्कम ग्रामपंचायतीकडे त्वरित जमा करण्यात यावी, या मागणीचे निवेदन बिरसी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने खासदार सुनील मेंढे यांना देण्यात आले.

हेही वाचा- नागपूरच्या जी-२०’ बैठकीत कशावर होणार चर्चा?

गोंदिया तालुक्यातील बिरसी येथे हवाई प्रशिक्षण संस्था व विमानतळ आहे. या विमानतळ प्राधिकरणाच्या रिकाम्या भूखंडाचे बिरसी ग्रामपंचायतचे तब्बल २.७ कोटी रुपयांचे मालमत्ता कर थकीत आहे. थकीत कराची रक्कम वसूल झाल्यास ग्रामपंचायतीला गावात विविध विकास कामे करण्यास हातभार लागेल. विमानतळ प्राधिकरणाने थकीत कराची रक्कम बिरसी ग्रामपंचायतीकडे जमा करावी. तसेच बिरसी ग्रामस्थ नागरिकांच्या समस्या, पुनर्वसनाच्या विविध सुविधा, अतिक्रमणात घरे तोडलेल्यांना भूखंड उपलब्ध करून द्यावे, आदी मागण्यांचा , निवेदनात समावेश आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात जि.प. बांधकाम सभापती संजय टेंभरे, बिरसी ग्राम पंचायत संरपच संतोष सोनवाने, उपसरपंच उमेशसिंह पंडले, ग्रापं सदस्य नरेंद्र बोरकर, रवी पहरले, योगराज मेश्राम, राकेश तावाडे, तिलेश्वर तावाडे, हेमराज तावाडे, अजयसिंह पंडले उपस्थित होते.

Story img Loader