नागपूर: नागपुरातील महाल परिसरात १७ मार्च २०२५ रोजी रात्री दोन धार्मिक गटात झालेल्या दंगलीनंतर प्रशासनाकडून एकूण ९ पोलीस ठाणे हद्दीतील संचारबंदी लावण्यात आली होती. त्यापैकी पाच पोलीस ठाणे आंतर्गत संचारबंदीत दोन तास शिथिलता देण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी गुरूवारी (२० मार्च २०२५) घेतला. आता शुक्रवारी पुहा हा निर्णय रद्द करत पोलीस आयुक्तांनी नवीन आदेश काढला आहे.
पोलीस आयुक्तांच्या नवीन आदेशानुसार शहरातील संचारबंदी लावलेल्या निर्णयामध्ये पुन्हा बदल करण्यात आला आहे. त्यानुसार नागपूर शहरातील सहा पोलीस ठाण्यांतर्गत संचारबंदीमध्ये देण्यात आलेली २ तासांची शिथिलता रद्द केली गेली आहे. त्याबाबतचे आदेशही नागपूर शहर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी जारी केले आहे.
दरम्यान गुरूवारी (२० मार्च २०२५ रोजी) पोलीस आयुक्तांनी लकडगंज, सक्करदरा, पाचपावली, शांतीनगर, इमामवाडा, यशोधरानगर या सहा पोलीस स्टेशन अंतर्गत दुपारी दोन ते संध्याकाळी चार या दोन तासासाठी शिथिलता प्रदान केली होती. मात्र आता जूना आदेश रद्द करत त्या सहा पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी पुन्हा पूर्ण वेळ संचारबंदीचा आदेश काढला आहे.
नागपुरात दोन धार्मिक गटात दंगल घडल्यावर एकूण ११ पोलीस स्टेशन हद्दीत संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. त्यापैकी दोन पोलीस स्टेशन हद्दीतील संचारबंदी गुरूवारीच उठवण्यात आली होती. तर मूळ दंगल घडलेल्या शहरातील तीन पोलीस ठाणे हद्दीत संचारबंदी कायम ठेवण्यात आला होती. त्यामुळे आता एकूण नऊ पोलीस स्टेशन हद्दीत संचारबंदी कायम करण्यात आलेला आहे.
पोलिसांच्या निर्णयानुसार कोणत्या पोलीस ठाण्यात संचारबंदी…
नागपूर शहरातील गणेशपेठ, तहसील, कोतवाली, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, इमामवाडा आणि यशोधरानगर या नऊ पोलीस ठाणे हद्दीत संचारबंदी पोलीस आयुक्तांच्या नवीन आदेशानुसार राहणार आहे.
प्रकरण काय? नागपुरातील महाल परिसरात १७ मार्च २०२५ रोजी एका गटातील युवकांनी पोलिसांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरात पोलिसांनीही त्या गटावर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवला. हा सर्व प्रकार सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडला. याचा परिणाम शहरातील सामान्य जनजीवनावर झालेला आहे. शहराच्या काही भागात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.